Photo Credit- Social Media
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. अवघ्या वर्षभरापूर्वीच नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. पण हा पुतळा अचानक कोसळल्याने राज्यभरातून त्याची तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं असून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचीच तोडफोड केल्याचे समोर आले आहे. तर, खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील कॉन्ट्रॅक्टर हा ठाणे जिल्ह्यातला असल्याचे सांगत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच बोट दाखवले आहे.
हेदेखील वाचा: विखे-पाटील म्हणजे महादेवाच्या पिंडीवर बसलेले विंचू; भाजपच्याच नेत्याचा गंभीर आरोप
“हा पुतळा नेमका कोणी उभारला, कोणाला टेंडर देण्यात आलं, पुतळ्याचा दर्जा कसा होता, पुतळ्याचा नीट अभ्यास केला होता का, ह्या पुतळा उभारणीचं कॉन्ट्रॅक्ट ठाण्यातील व्यक्तीला देण्या आलं होतं,’ असे अनेक प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून उपस्थित केले आहेत. तर, हा पुतळा नौदलाने उभारला असून त्याच्या देखभालीचं कामही नौदलाकडेच होते, अशी माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे.
रविंद्र चव्हाण म्हणाले, ‘राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या कामाची आणि त्याची निगा राखण्याची, तेथील स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी नौदलाची होती. महाराजांचा हा पुतळा नौदलाच्या अखत्यारीत येतो. नौदलानेच या पुतळ्याची उभारणी केली होती. मेसर्स आर्टीस्ट्री नावाच्या कंपनीला या पुतळा उभारणीचे काम देण्यात आले होते. जयदीप आपटे हे या कंपनीचे संचालक आणि केतन पाटील हे स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होते. एक वर्षापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पुतळ्याचे अनावरण केले होते. पण वर्षभरातच पुतळ्याला गंज लागला असल्याचे निदर्शनास आले होते. आठ दिवसांपूर्वीच म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागानं पत्र लिहून ही बाबत नौदलाच्या निदर्शनास आणून दिली होती.
हेदेखील वाचा: भाजपने डाव टाकला; माजी मुख्यमंत्री गळाला लागला, ‘या’ दिवशी होणार प्रवेश
दरम्यान या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल व्हावा, दोषींवर कडक कारवाई करावी, यासाठी रविंद्र चव्हाण यांनी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच, शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात हलगर्जी सहन केली जाणार नाही. येत्या दोन महिन्यात पुतळा पुन्हा बसवण्यात येईल असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.