सौजन्य - नवराष्ट्र टीम
इंदापूर : इंदापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सूर्यकांत कोकणे हप्तेखोर, जातीयवादी असून खोटे गुन्हे दाखल करतात, असे गंभीर आरोप करत त्यांची तात्काळ चौकशी करून निलंबन करण्याची मागणी शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलकांच्या वतीने गुरुवारी (दि.२५) इंदापूर येथे “भिक मागो आंदोलन” करण्यात आले. आंदोलकांनी हातात डबे घेत आणि टाळ वाजवत नागरिकांना भीक मागितली.
भीमशक्ती सामाजिक संघटनेचे नेते शरद चितारे, रिपाइं चे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरवदे, ॲड.बापूसाहेब साबळे, ॲड.समीर मखरे, संजय कांबळे, सूरज धाईंजे, नितीन झेंडे, अल्ताफ मोमीन, गौस सय्यद या आंदोलनात सहभागी झाले होते.
कोकणे यांच्या कार्यकाळात इंदापूर शहर व परिसरात मटका-जुगार, वाळू उपसा, वेश्याव्यवसाय, गुटखा विक्री, दारू विक्री आणि गांजाची तस्करी यांसारख्या अवैध धंद्यांना पोलीस संरक्षण मिळत असून, लाखो रुपयांचा गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप करत दिनांक २२ सप्टेंबरपासून इंदापूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. श्रृंखलाबद्ध आंदोलनाचा भाग म्हणून आंदोलकांच्या वतीने गुरुवारी भिक मागो आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, आंदोलनाच्या सुरुवातीला पोलीस निरीक्षकांनी देऊ केलेले समजपत्र आंदोलनकर्त्यांनी नाकारले होते. परंतू, बुधवारी (दि.२४) आंदोलनकर्ते बाळासाहेब सरवदे यांनी ते स्वीकारले, मात्र आंदोलनावर ठाम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरवदे यांनी पोलिसांच्या `अखत्यारित`अवैध धंद्यांचे पुरावे देऊ, त्यानंतर कारवाई होईल का, हा प्रश्न उपस्थित केला. “जोपर्यंत कोकणे यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील. तसेच पुढील टप्प्यात आमदार दत्तात्रय भरणे आणि प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोरही आंदोलन करू,” असा इशारा त्यांनी दिला.
पोलिसांनी दिलेल्या समजपत्रात २०२४-२५ या कालावधीत झालेल्या पोलीस कारवायांची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये अवैध दारू विक्रीवर २८६, जुगार ११३, अवैध शस्त्र बाळगणे ३, अवैध गौण खनिजावर २३ आणि देहव्यापारावर १ कारवाई करण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. समजपत्रात पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, यापूर्वी कारवाया करण्यात आल्या असून भविष्यातही या प्रकारच्या अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई केली जाईल.
हे सुद्धा वाचा : झक मारली अन् पवार कुटुंबाला…; बारामतीत लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली