साताऱ्यात एनसीईआरटीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
सातारा : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) कडून मराठा साम्राज्याचा नकाशा आठवीच्या अभ्यासक्रमातून वगळल्याच्या निषेधार्थ आज साताऱ्यात तीव्र आंदोलन करण्यात आले. सकाळी अकराच्या सुमारास पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाचे नेतृत्व श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले यांनी केले. आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा बांधव, नागरिक, नगरसेवक, शिवप्रतिष्ठानचे धारकरी, मुस्लिम बांधव तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. नकाशा हटवला तरी सत्य हटणार नाही, इतिहास पुसणार नाही, महाराष्ट्र झुकणार नाही, अशा आशयाचे फलक हातात घेऊन शाळकरी विद्यार्थीही उत्स्फूर्तपणे मोर्चात सहभागी झाले.
यावेळी वृषालीराजे भोसले यांनी इशारा देताना सांगितले की, मराठा साम्राज्याचा नकाशा पूर्ववत न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडण्यात येईल. तसेच छत्रपती घराण्याच्या वतीने याचिका दाखल करण्यात येणार असून, केंद्र सरकारला १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला जाणार आहे. हा केवळ अभ्यासक्रमाचा विषय नसून महाराष्ट्राच्या अस्मितेशी निगडित मुद्दा असल्याचे त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर घाला घालण्याचा प्रकार थांबवावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
मराठ्यांची ऐतिहासिक राजधानी असलेल्या साताऱ्यात या निर्णयाविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी एनसीईआरटीच्या निर्णयाचा निषेध करत इतिहासाशी छेडछाड थांबवण्याची मागणी केली. मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. संबंधित निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
मिळकतकरात 50 टक्के सवलतीला मान्यता
पुणे महापालिकेच्या हद्दीतील महिलांच्या नावावर असलेल्या पाचशे चौरस फुटापर्यंतच्या मिळकतींना मिळकतकरात ५० टक्के सवलत देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. परंतु, ही सवलत केवळ चालू आर्थिक वर्षासाठीच देण्यात येईल, अशी अट प्रशासनाने घातली आहे.
मिळकत करात 50 टक्के सवलतीला पुणे महापालिकेची मान्यता; सवलतीनंतर घटणार महापालिकेचे उत्पन्न






