शिरवळमध्ये अमली पदार्थांविरोधात एक दिवसीय बंद पाळत जनआक्रोश; पोलिसांना दिले गेले निवेदन
शिरवळ : शिरवळमध्ये अलीकडे उघडकीस आलेल्या एमडी (MD) ड्रग्ज प्रकरणाच्या निषेधार्थ मंगळवारी संपूर्ण गाव रस्त्यावर उतरले. व्यापारी, व्यावसायिक, ग्रामस्थ, युवक, महिला, विविध सामाजिक संस्था आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळत अमली पदार्थांविरोधात तीव्र जनआक्रोश व्यक्त केला. गावातील मुख्य बाजारपेठ दिवसभर बंद ठेवण्यात आली.
अंबिका माता मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा मूक मोर्चा काढून व्यसनमुक्त शिरवळचा निर्धार व्यक्त करण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच शिरवळ पोलीस ठाण्याला निवेदन देत अमली पदार्थांसह गावठी हातभट्टी दारू, मटका, जुगार, बिंगो लॉटरी आणि इतर सर्व प्रकारचे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली.
पुणे, मुंबई, पालघरसह काही जिल्ह्यांतील शाळांना आज पुन्हा सुट्टी; अनेक ठिकाणी पावसाचा हाहा:कार
काही दिवसांपूर्वी शिरवळमध्ये एमडी ड्रग्ज जप्तीची कारवाई झाल्यानंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली होती. या घटनेमुळे पालक, शिक्षक आणि नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असून, तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याची भावना व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर गाव बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला व्यापारी वर्ग, विविध सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मंगळवारी सकाळपासूनच शिरवळमधील सर्व दुकाने, व्यावसायिक आस्थापने आणि बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. त्यानंतर अंबिका माता मंदिर परिसरात नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. कोणतीही घोषणाबाजी न करता शांततेच्या मार्गाने काढण्यात आलेल्या या मोर्चामधून अमली पदार्थांविरोधातील तीव्र निषेध नोंदविण्यात आला.
मोर्चात सहभागी झालेल्या युवकांनी आणि महिलांनी हातात व्यसनमुक्तीचे संदेश देणारे फलक घेतले होते. ‘अमली पदार्थमुक्त शिरवळ, युवकांचे भविष्य वाचवा, अवैध धंदे बंद करा’ अशा संदेशांद्वारे समाजजागृती करण्यात आली.
मान्यवरांनी मांडली भूमिका
मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर मान्यवरांनी आपली भूमिका मांडली. यावेळी अमली पदार्थांची वाढती विक्री हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नसून समाजाच्या भवितव्याशी संबंधित गंभीर विषय असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. तरुणांना व्यसनाच्या गर्तेत ढकलणाऱ्या प्रवृत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.






