सौजन्य - नवराष्ट्र टीम
शरद बुट्टे पाटील यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने उत्तर पुणे जिल्ह्यात पक्षाचे राजकीय बळ लक्षणीयरीत्या वाढले असून, भाजपला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे.
या प्रवेश सोहळ्याला माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यासह सुरेश घूले, राजेंद्र कोरेकर, सुनील चांदेरे, लक्ष्मण टोपे, कैलास सांडभोर, अनिलबाबा राक्षे, अरुण चांभारे, विलास कातोरे, अजित बुट्टे पाटील, जयसिंग दरेकर, चांगदेव शिवेकर, निलेश थिगळे, अमोल पानमंद, आशिष येळवंडे, पप्पू टोपे, सय्यद इनामदार, मोबिन काझी, गणेश बोत्रे, राम गोरे, सचिन पानसरे, नगरसेविका विजया तोडकर, रेश्मा मुटके, सुनीता बुट्टे पाटील, श्रद्धा मांडेकर, सुनील देवकर, काळूराम पिंजण, शरद निखाडे, शिवाजी डावरे, रोहित डावरे, दत्तात्रय टेमगिरे यांच्यासह विविध गावांचे सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शरद बुट्टे पाटील यांनी खेड तालुक्यातील भामा खोऱ्याचे तीन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. ते १५ वर्षे जिल्हा परिषद सदस्य राहिले असून, जिल्हा परिषदेचे सभापती म्हणूनही त्यांनी प्रभावी काम केले आहे. गट राखीव झाल्यानंतर त्यांनी आपल्या समर्थक महिलेला बिनविरोध जिल्हा परिषद सदस्य करून जिल्ह्याच्या राजकारणात एक वेगळा इतिहास घडविला. यातून त्यांची संघटन क्षमता, नेतृत्वगुण आणि राजकीय दूरदृष्टी स्पष्टपणे दिसून येते, असे गौरवोद्गार अजित पवार यांनी काढले.
माजी आमदार दिलीप मोहिते यांनी आपल्या भाषणात शरद बुट्टे यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. “विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी जीवतोडून काम केले आहे. त्यांच्या विकासात्मक दूरदृष्टीचा आम्ही सन्मान करतो,” असे सांगत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका केली. “दुसऱ्या गटातील इच्छुक उमेदवार स्वतःच्या गटात जागा असूनही इकडे का लढतोय? पाईट –आंबेठाण जिल्हा परिषद गट मी ओळखू शकलो नाही तर तू काय ओळखणार?” असे म्हणत त्यांनी नाव न घेता घणाघात केला. तसेच “फक्त पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकता येत नाहीत. दम असेल तर स्वतःच्या गटातून निवडणूक लढवून दाखवा,” असे खडेबोलही त्यांनी सुनावले.
या प्रवेशावेळी शरद बुट्टे पाटील यांच्यासोबत विविध गावांचे सरपंच, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. यामुळे खेड तालुक्यासह संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढली असून, अजित पवार यांनी आपल्या बालेकिल्ल्याची भिंत आणखी मजबूत केल्याचे स्पष्ट झाले आहे. राजकारणातील ‘हुकमी एक्का’ म्हणून अजित पवारांनी पुन्हा एकदा अचूक चाल टाकल्याची चर्चा या प्रवेश सोहळ्यानंतर राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
हे सुद्धा वाचा : काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी घेतला मोठा निर्णय; ‘या’ पक्षासोबत केली आघाडी






