सौजन्य - नवराष्ट्र टीम
जेजुरी : महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या जेजुरी गडावर मंदिर सेवेकरी, पुजारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धार्मिक नियमांचे पालन करण्यास सांगितल्याच्या कारणावरून पुजाऱ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भाविक व्यवस्थापन आणि सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत खंडोबा मंदिरातील पुजारी अमर बारभाई यांना काही भाविकांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. या हल्ल्यात त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले असून डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरातील पवित्र मानल्या जाणाऱ्या रंगमहल परिसरात चप्पल घालून प्रवेश करण्यास मनाई असतानाही काही भाविक तेथे चप्पलसह गेले होते. यावेळी पुजारी अमर बारभाई यांनी संबंधितांना नियमांची माहिती देत चप्पल बाहेर काढण्याची विनंती केली. मात्र, याच कारणावरून त्यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही महिन्यांत जेजुरी गडावर सेवेकरी, कर्मचारी आणि गर्दी नियंत्रणासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींवर हल्ल्यांच्या तीन ते चार घटना घडल्या आहेत. मात्र, अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना होत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. गुरव, पुजारी, वीर, कोळी, गडशी, सेवेकरी, मानकरी आणि देवस्थान कर्मचारी हे भाविकांना सुरळीत दर्शन मिळावे यासाठी सातत्याने कार्यरत असतात. गर्दीचे नियोजन, शिस्त राखणे आणि धार्मिक परंपरांचे पालन होईल याची जबाबदारी ते पार पाडत असतात. मात्र, नियमांचे पालन करण्यास सांगितल्यावर त्यांनाच दमदाटी आणि मारहाणीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. यापूर्वी देवस्थानच्या शिपायांवरही हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. वाढती गर्दी आणि काही व्यक्तींची बेशिस्त वर्तणूक यामुळे मंदिर परिसरातील सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी अधोरेखित होत आहेत. त्यामुळे जेजुरीसारख्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रात सुरक्षा व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी जोर धरत आहे.
विशेष धोरण राबविण्याची गरज
मंदिर परिसरात अधिक सक्षम सीसीटीव्ही यंत्रणा, अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई तसेच सेवेकरी व कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी विशेष धोरण राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. जेजुरी हे राज्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे महत्त्वाचे केंद्र असल्याने येथे सेवा बजावणाऱ्या पुजारी, सेवेकरी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे ही देवस्थान प्रशासनासह शासनाचीही जबाबदारी असल्याचे मत व्यक्त होत आहे.
सेवाभावी परंपरेला धक्का; सुरक्षेची मागणी तीव्र
जेजुरी गडावरील गुरव, पुजारी, वीर, कोळी, गडशी, सेवेकरी, मानकरी, कर्मचारी आणि ग्रामस्थ हे भाविकांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबवत असतात. अन्नदान, महाप्रसाद, दर्शन व्यवस्थापन आणि भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे घटक सातत्याने कार्यरत असतात. विशेषतः गेल्या तीन दशकांहून अधिक काळ चंपाषष्ठी महोत्सवासह विविध धार्मिक सोहळ्यांमध्ये हजारो भाविकांसाठी मोफत महाप्रसाद व भोजन व्यवस्था केली जाते. मात्र, अलीकडील मारहाणीच्या घटनेमुळे या सेवाभावी घटकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
सुरक्षा रक्षक आणि पोलीस बंदोबस्त अपुरा
गर्दीच्या काळात उपलब्ध सुरक्षा रक्षक आणि पोलीस बंदोबस्त अपुरा पडत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. त्यामुळे सेवेकऱ्यांवरच हल्ले होत असतील तर भविष्यात गर्दी नियंत्रण आणि भाविक व्यवस्थापनाचे मोठे आव्हान निर्माण होऊ शकते, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिकांच्या मते, विविध लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मंदिराला भेट देत असले तरी सेवेकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अपेक्षित गांभीर्याने हाताळला जात नाही. जेजुरीसारख्या राज्यातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रात सुरक्षा व्यवस्थेचे बळकटीकरण करणे ही काळाची गरज असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.






