दौंड तालुक्याच्या पूर्व भागात पावसाची दमदार हजेरी; बळीराजा सुखावला, शेती कामांना वेग
राजेगाव : गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाळा आणि उकाड्याने हैराण झालेल्या दौंड तालुक्याच्या पूर्व मलठण, वाटलूज, नायगाव, राजेगाव, खानवटे, स्वामी चिंचोली, खडकी भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. पूर्व भागात वरुणराजाने दमदार एन्ट्री केली असून, तब्बल तीन तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. या पहिल्याच मोठ्या पावसामुळे शेतकरी राजा कमालीचा आनंदी झाला असून, सुखावलेल्या बळीराजाने रखडलेल्या शेतीच्या कामांना आता जोमाने सुरुवात केली आहे.
दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील राजेगाव आणि परिसरातील गावांमध्ये दुपारच्या सुमारास अचानक हवामानात बदल झाला. दुपारपर्यंत असलेल्या कडक उन्हांतर अचानक आभाळ भरून आले आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता पावसाचा जोर इतका वाढला की, सलग तीन तास मुसळधार पाऊस कोसळत होता. या जोरदार पावसामुळे गावातील आणि परिसरातील ओढे, नाले ओसंडून वाहू लागले. राजेगावसह परिसरातील काही प्रमुख रस्त्यांवर आणि सखल भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतुकीवर याचा थेट परिणाम झाला.
दरम्यान, काही मुख्य रस्त्यांवर गढूळ पाण्याचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प करण्यात आली होती. मात्र, पाऊस ओसरल्यानंतर आणि रस्त्यावरील पाणी कमी झाल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली. हा पाऊस पूर्व भागातील शेतीसाठी अत्यंत अमृतमय ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत होता. वाढत्या उन्हामुळे उभ्या पिकांना पाण्याचा ताण जाणवू लागला होता, तसेच विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीतही घट झाली होती. परंतु, या तीन तासांच्या दमदार पावसाने पिकांना जणू नवसंजीवनी दिली आहे. उन्हाने करपू लागलेल्या ऊस, चारा पिके आणि इतर फळबागांना या पावसाचा मोठा आधार मिळाला असून पिके पुन्हा एकदा टवटवीत झाली आहेत.
खरीप पेरण्यांना येणार वेग; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पावसाने जमिनीतील ओल वाढली असून, हवामान पिकांसाठी पोषक बनले आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, या पावसामुळे येत्या पुढील काही दिवसांत परिसरातील खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण होण्यास मोठी मदत होणार आहे. बहुतांश शेतकरी मशागतीची कामे आटोपून पावसाची चातकासारखी वाट पाहत होते. आता जमीन पेरणीयोग्य झाल्यामुळे तालुक्याच्या पूर्व भागात कपाशी, सोयाबीन, बाजरी आणि मका यांसारख्या खरीप पिकांच्या पेरण्यांची लगबग सुरू होणार आहे. बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर निसर्गाने साथ दिल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे.






