आंबेगाव तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका; पिकांमध्ये पाणीच पाणी, शेतकऱ्यांची धावपळ
मंचर : आंबेगाव तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी अर्धा तास सर्वदूर पाऊस झाला. या अवकाळी पावसाचा फटका शेती क्षेत्राला बसू लागला आहे. अनेक भागांत झालेल्या जोरदार पावसामुळे तरकारी पिकांच्या सऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे नव्याने लावलेल्या तसेच वाढीच्या अवस्थेतील रोपांना धोका निर्माण झाला आहे. पावसाचे पाणी शेतातून काढून देण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली.
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेनंतर झालेल्या अचानक पावसामुळे काही पिकांना दिलासा मिळाला असला तरी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. सऱ्यांमध्ये पाणी साचल्याने मुळांना हवा मिळण्यास अडथळा निर्माण होऊन रोपे पिवळी पडणे, कुजणे तसेच वाढ खुंटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतात साचलेले पावसाचे पाणी काढून देताना शेतकऱ्यांची धावपळ झाली.
विशेषतः टोमॅटो, मिरची, वांगी, भेंडी यांसारख्या तरकारी पिकांवर याचा परिणाम होऊ शकतो, अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. काही ठिकाणी शेतकरी पाण्याचा निचरा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करत आहेत. हवामानातील बदलामुळे पुढील काही दिवस पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
कण्हेरीत ढगफुटीसदृश्य पाऊस
तालुक्याच्या पश्चिम भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह कण्हेरीच्या डोंगरावर ढगफुटीसदृश्य पावसामुळे ओढ्यांना पूर आला. तासभर झालेल्या पावसाने वीटभट्टी मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, अतिट येथे वीज पडून एका गायीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
उकाड्यानंतर पावसाची हजेरी
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर येत असून, मुंबई उपनगरातील काही भागांत शुक्रवारी रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने उकाडा आणि वाढलेल्या उमसामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत तापमानासोबतच हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने नागरिक अक्षरशः घामाघूम होत होते. अशा परिस्थितीत अचानक पडलेल्या हलक्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.
Maharashtra Weather : उकाड्यानंतर पावसाची हजेरी; मुंबई उपनगरात रिमझिम पावसाने वातावरण आल्हाददायक






