सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याला अटक केल्यानंतर रुपाली चाकणकर यांचे खरात सोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. रुपाली चाकणकर यांचे अशोक खरात याच्यासोबतचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये रुपाली चाकणकर या अशोक खरात याचे पाद्यपूजन करताना बघायला मिळत आहे. तसेच काही व्हिडीओमध्ये रुपाली चाकणकर खरातचे कौतुक करताना दिसत आहेत. चाकणकर यांनी महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता चाकणकरांविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. रुपाली चाकणकरांना अटक करा, अशा मागणीसाठी पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीने शनिवारी फर्ग्युसन कॉलेज रोड येथे आंदोलन करण्यात आले.
पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. रूपाली चाकणकर यांनी महिलांच्या चारित्र्याशीच खेळ केला, हा गुन्हा अक्षम्य आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा भंग आणि महिलांचे शोषण केलेल्या खरात या भोंदू बाबाला संरक्षण दिल्याबद्दल रुपाली चाकणकरांना अटक झालीच पाहिजे. राज्यातील ‘एपस्टीन’ खरात याची ३० दिवसांत चौकशी करा. तसेच त्या बाबाच्या अनेक गैरकृत्यात सहभागी असलेल्या मंत्र्यांची त्वरीत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी स्वाती शिंदे यांनी केली आहे.
‘मंत्र्यांनो खुर्च्या खाली करा’, ‘भोंदूबाबा खरातला कडक शासन करा’, अशा घोषणांचे फलक आंदोलकांनी हाती घेतले होते. भोंदूबाबा खरात आणि रुपाली चाकणकर यांच्या प्रतिमांना जोडे मारण्यात आले. या आंदोलनात अर्चना शाह, अनिता मकवाना, प्राजक्ता जाधव, रेखा जैन, अंजली सोलापूरे, राजश्री दामले-चव्हाण, रुपाली पवार, मनोरमा चौधरी, कल्पना शिंदे, ज्योती अडागळे, अंजली देसाई, सुवर्णा माने, सुरेखा मारणे आदी सहभागी झाले हाेते.
शहराध्यक्ष शिंंदेंकडून चाकणकरांची पाठराखण?
रुपाली चाकणकर यांच्यावर टिका हाेत असतानाच, काॅंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी चाकणकर यांची बदनामी करू नका, वेळ पडली तर त्यांना काॅंग्रेस पक्षात घेण्यासाठी शिफारस करू असे वक्तव्य केल्याची चर्चा आहे. शिंदे यांच्या वक्तव्यावर काॅंग्रेसच्या प्रवक्त्यांनी ते शिंदे यांचे वैयक्तिक मत असल्याची प्रतिक्रीया दिली आहे.






