सौजन्य - नवराष्ट्र टीम
बारामती : राज्यात काल झालेल्या वादळी पावसामुळे २४ जिल्ह्यात अंदाजे १ लाख ५०० एकराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळण्याच्या दृष्टीने बाधित क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले असून, याबाबतचा अहवाल प्राप्त होताच तातडीने मदत करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
कृषीमंत्री भरणे यांनी आज इंदापूर तालुक्यातील वडापुरी, सुरवड, गणेशवाडी, बावडा, टणू, पिंपरी बु. आणि लाखेवाडी भागात झालेल्या नुकसानीबाबत प्रत्यक्ष बांधावर जाणून पाहणी करुन शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, तहसीलदार जीवन बनसोडे, तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे आदी उपस्थित होते.
कृषीमंत्री भरणे म्हणाले की, हवामान बदलामुळे राज्यात झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाधित क्षेत्रातील एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, अशा परिस्थितीत कृषी विभागाने विविध योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही करावी. नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांनी खचून जावू नये, राज्य शासन आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे.
हे सुद्धा वाचा : आचारसंहिता संपल्याने विकासकामांना मिळणार वेग; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मार्ग मोकळा
लाखो शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळात मंजूरी देण्यात आली आहे. या योजनेचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. यापुढे शेतकरी कर्जबजारी होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत, असेही कृषीमंत्री भरणे यांनी सांगितले.
बारामती परिसरात वादळी पावसाने मोठे नुकसान
बारामती शहरासह तालुक्यातील अनेक भागांमध्ये शुक्रवारी (दि ५) सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक झाडे कोसळली आहेत. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने तालुक्यातील अनेक ठिकाणी केळी, ऊस यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पर्यावरण दिन दिवशीच अनेक झाडे कोसळल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पर्यावरण प्रेमींनी हळहळ व्यक्त केली. दरम्यान वादळी वाऱ्यासह बहुतांश भागात चांगला पाऊस झाला. मात्र यामध्ये नुकसानच अधिक झाले. बारामती शहरातील सातव चौक शेजारील शॉपिंग कॉम्प्लेक्स समोरील अनेक झाडे कोसळली, यामध्ये काही वाहनांवर झाड कोसळल्याने वाहनांचे नुकसान झाले. बारामती शहरातील इंदापूर रोड, माळेगाव रोड, पाटस रोड या भागातील देखील अनेक झाडे वादळी वाऱ्यामुळे कोसळली. बारामती नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने कोसळलेली झाडे रस्त्यापासून बाजूला काढली आहेत.






