संग्रहित फोटो
पुणे/चंद्रकांत कांबळे : पुणे शहरातील वाढती वाहनसंख्या लक्षात घेता वाहन चालविण्याच्या परवान्यांसाठी नागरिकांचा प्रतिसाद वाढत असल्याचे दिसून आले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पुणे यांच्या माध्यमातून मागील दोन वर्षांत तब्बल ४ लाख ३९ हजार २५३ वाहन चालकांनी कायमस्वरूपी वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) प्राप्त केला आहे. यामध्ये दुचाकी, चारचाकी तसेच इतर वाहनांचा समावेश आहे.
१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत पुणे आरटीओकडून सर्वाधिक परवाने चारचाकी वाहनांसाठी देण्यात आले. चारचाकी वाहनांसाठी २ लाख २९ हजार ५४३ जणांनी परवाने मिळवले, तर दुचाकी वाहनांसाठी २ लाख २ हजार ९६० नागरिकांनी लायसन्स काढले आहे. याशिवाय इतर वाहन प्रकारांसाठी ६ हजार ७५० परवाने वितरित करण्यात आले.
चारचाकी वाहन चालकांची चाचणी कासारवाडी येथील ‘आयडीटीआर’ केंद्रावर घेतली जाते. तर दुचाकी आणि तीनचाकी वाहन चालकांची चाचणी आळंदी रस्त्यावरील फुलेनगर कार्यालयात पार पडते. वाहन चालविण्याच्या कौशल्याची तपासणी केल्यानंतरच कायमस्वरूपी परवाना दिला जातो. पुणे शहरात दररोज सुमारे एक हजार नवीन वाहनांची भर पडत असताना वाहन परवाना काढणाऱ्यांचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचेही दिसून येत आहे.
वाहन परवाना मिळविण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. सर्वप्रथम शिकाऊ परवाना (लर्निंग लायसन्स) घ्यावा लागतो. त्यानंतर ३० दिवसांनंतर किंवा सहा महिन्यांच्या आत कायमस्वरूपी परवान्यासाठी अर्ज करता येतो. ऑनलाइन प्रक्रियेमुळे नागरिकांचा वेळ वाचत असून, आरटीओ कार्यालयातील गर्दीही कमी होत आहे.
मागील दोन वर्षांतील परवान्यांची आकडेवारी
दुचाकी : २,०२,९६०
चारचाकी : २,२९,५४३
इतर वाहने : ६,७५०
एकूण : ४,३९,२५३
सुरक्षित वाहन चालवण्यासाठी आणि वाहतूक नियमांच्या पालनासाठी नागरिकांनी वैध परवाना घेणे गरजेचे आहे. — स्वप्निल भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.






