शिरसाटांच्या 'त्या' वक्तव्यावरून हसन मुश्रीफ भडकले
राज्यातील राजकीय वातावरणात सध्या कमालीचे गोंधळाचे वातावरण दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सतत कुरघोड्या करत असल्याचे चित्र असतानाच आता सत्ताधाऱ्यांमधील मित्रपक्षातील नेतेच आता एकमेकांवर टीकाटिपण्ण्या करायला लागले आहेत. यावरूनच आता शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यात चांगलीच जुंपली आहे. संजय शिरसाट यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून मुश्रीफ यांनी निशाणा साधत याची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे म्हंटले आहे. तर, संजय शिरसाट यांनीदेखील पलटवार करत, “तुम्हाला काय तक्रार करायची आहे ती करा,” अश्या शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.
मंत्री संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आल्याचे दिसून आले. आधीच शिवसेना ठाकरे गटाचे सात खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची बातमी ताजी असतानाच संजय शिरसाट यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान सुरु असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ ची पुन्हा नव्याने सुरुवात झाली. यावरून आता राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी भाष्य केल्याने सत्ताधारी नेत्यांमध्येच काही आलबेल नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावरून हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “संजय शिरसाट हे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत. गेल्या मंगळवारी मी शिरसाटांबद्दल शिवसेनेचे समन्वय समितीचे उदय सामंत आणि दाद भुसे यांच्याकडे स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली होती. आमच्या पक्षात काही झालं असेल तर त्यावर शिरसाट कसे बोलू शकतात? येणाऱ्या समन्वय समितीच्या बैठकीत आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार करणार आहोत,” असे ते यावेळी म्हणाले.
विधान परिषदेतील जागांवरून महायुतीत वादाची ठिणगी; भाजपचे संख्याबळ कितीही असले तरी…
संजय शिरसाट यांनी हसन मुश्रीफ यांच्या भूमिकेवरून पलटवार केला आहे. ते यावेळी म्हणाले, “मी काय वाईट बोललो मला तेच कळालं नाही? राष्ट्रवादीचे आमच्या संपर्कात आहेत म्हणजे काय? एकमेकांशी संपर्क नसावा का ? तुम्ही संपर्काचा अर्थ पक्ष फुटतोय असं का घेता? पक्षांमध्ये आलबेल नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? अनेक नेते एकमेकांच्या संपर्कात असतात. उबाठाचे नेते आमच्या संपर्कात आहेत, काँग्रेसचे नेते आमच्या संपर्कात आहेत, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते संपर्कात आहेत. संपर्कात असणं आणि पक्ष सोडून जाणं हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत. याचा चुकीचा अर्थ तुम्ही काढू नका, ज्याला कोणाला सोडून जायचं असेल तर जाईलच,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “आज – काल पक्ष बदलणं इतकच सोयीस्कर झाल आहे. सकाळी माझ्याबरोबर होता दुपारी कुठे आणि संध्याकाळी कुठे याचं काही गणित लागत नाही. मी जे विधान केले ते अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत राष्ट्रवादीची सुद्धा संपर्कात आहेत, त्यात काही गैर बोलू असं मला वाटत नाही. त्यांना काय तक्रार करायचे ते करू द्या, मी माझी भूमिका मांडली आहे,” असे ते यावेळी म्हणाले.
“पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध, भीतीपोटी अनावश्यक खरेदी टाळावी,” छगन भुजबळ यांचे मोठे वक्तव्य






