सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : पुणे शहरात अलीकडील पावसामुळे विविध भागांत पाणी साचणे, रस्त्यांवर पाणी तुंबणे, नागरिकांच्या घरात पाणी शिरणे, झाडे कोसळणे, वाहतुकीवर परिणाम होणे, अशा घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रशासनासोबत तातडीची आढावा बैठक महापौर कार्यालयात आयोजित केली. या बैठकीस अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर (जनरल) व अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) प्रजित नायर तसेच सर्व उपआयुक्त, विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान टेकड्यांवरून वाहणारे पावसाचे पाणी थेट रस्त्यांमार्गे नागरिकांच्या घरात शिरत असल्याच्या तक्रारींची दखल घेत महापौरांनी नाराजी व्यक्त केली. मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नाले सफाई आणि पावसाळी कामांबाबत प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश दिले. नाले सफाईसाठी दिलेल्या कंत्राटांची काटेकोर अंमलबजावणी करावी. संबंधित कंत्राटदारांकडे आवश्यक यंत्रसामग्री आहे का याची तपासणी करावी. कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याची जबाबदारी निश्चित करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
पाण्याची नियमित तपासणी करावी
बैठकीदरम्यान महापौरांनी शहरातील तलावांमध्ये दूषित पाण्यामुळे मासे मृत्यू होत असून, पाण्याची नियमित तपासणी करावी, तलावातील पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, जलपर्णी निर्मूलनासाठी कार्यक्षम यंत्रणा वापरावी, तसेच त्याचे जैविक खतामध्ये रूपांतर करणाऱ्या संस्थांशी समन्वय साधावा, पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी पर्यावरणपूरक उपायांचा अभ्यास करून अंमलबजावणी करावी, अशा विविध सूचना त्यांनी केल्या.
पावसाळ्यापूर्वी सर्व आवश्यक उपाययोजना पूर्ण करून नागरिकांना होणारा त्रास कमी करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. कामात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर जबाबदारी निश्चित केली जाईल. – मंजुषा नागपुरे, महापौर
पुण्यात पुढील तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता
पुणे शहरात पुढील तीन दिवस दुपारी कडक उन्हाचा तडाखा आणि सायंकाळी मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तापमानात हळूहळू घट होणार असून वातावरणातील हा विरोधाभास कायम राहणार आहे. शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून दुपारी तीव्र उष्णता आणि सायंकाळी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची नोंद होत आहे. आगामी तीन दिवसांतही हेच चित्र कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मेघगर्जना, वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.






