संग्रहित फोटो
पुणे : रस्त्यांच्या कामासाठी डांबर मिक्स लवकर उपलब्ध करून देण्यासाठी शिंदेवाडी येथे दुसरा मिक्स प्लांट उभारण्यात येणार आहे. या नवीन प्लांटमुळे पुण्यातील अनेक भागात डांबर पुरवठा करता येणार आहे. प्लांटसाठी शिंदेवाडी येथील महापालिकेची जकात नाक्याची सुमारे सव्वा पाच एकर इतकी जागा असून, ती जागा महापालिकेने पुन्हा एकदा ताब्यात घेतली आहे. तसेच नवीन प्लांटमुळे पुणे महापालिकेच्या येरवडा येथील प्लांटवरील ताण कमी हाेण्यास मदत हाेणार आहे.
पुणे शहरातील रस्ते बांधणी, डांबरीकरण, दुरुस्तीसाठी डांबर मिक्स आवश्यक असते. महापालिकेने याकरीता येरवडा येथे २०१६ साली प्लांट उभा केला आहे. या प्लांटमधुन आजपर्यंत सुमारे सात ते साडे सात लाख मेट्रीक टन इतक्या डांबरी मिक्सचे उत्पादन घेण्यात आले आहे. या प्लांटवर उत्पादनाची जबाबदारी असल्याने याचा वापर माेठ्या प्रमाणावर झाला आहे. यंत्रणेतील सुटेभाग आणि इंजिनची झीज झाली आहे. त्यामुळे देखभाल दुरुस्तीसाठी हा प्लांट वारंवार बंद ठेवावा लागत आहे, अन्यथा ताे बंद पडत आहे. यामुळे मागणीप्रमाणे डांबरी मिक्सचा पुरवठा केला जात नाही. तसेच या प्लांटपासून संपुर्ण शहरात डांबरी मिक्सचा पुरवठा करण्यासाठी वाहतुकीला विलंब लागताे. त्यामुळे वाहतुक खर्चातही वाढ हाेत आहे.
दरम्यान या पार्श्वभुमीवर महापालिका प्रशासनाकडून शहराच्या चारही दिशांना डांबरी मिक्स प्लांट उभारण्याची भुमिका घेण्यात आली. त्यानुसार शहराच्या दक्षिण दिशेला शिंदेवाडी येथे प्लांट उभारला जाणार आहे. यासंदर्भात प्रशासनाने प्रस्तावावर अभिप्राय नाेंदविला आहे. ताे प्रस्ताव अभिप्रायासह स्थायी समितीने मंजुर केला आहे. शिंदेवाडी येथील महापालिकेच्या जकात नाक्याची सुमारे सव्वा पाच एकर इतकी जागा असुन, त्याचा वापर पीएमपीएमएलच्या गाड्या उभ्या करण्यासाठी केला जात हाेता. ही जागा महापालिकेने पुन्हा एकदा ताब्यात घेतली आहे. या ठिकाणी सध्या बसचे टायर, ड्रम, बंद पडलेल्या जुन्या गाड्या, आदी भंगार माल ठेवला जात आहे. या जागेला जाेडणारे दाेन रस्ते असुन, त्यामुळे शहराच्या दक्षिण भागात डांबर पुरवठा करणे शक्य हाेणार आहे. या जागेवर पार्कर प्लांट इंडीया लि. यांच्याकडून प्लांट बसविला जाईल. तसेच डांबर टॅंक, लाेडींग ट्रॅक उभारण्यात येईल.
या प्लांटमधून पुणे – मुंबई – बंगळूरु महामार्गा लगतच्या नऱ्हे, धायरी, आंबेगाव, नांदेड, किरकटवाडी, नांदाेशी, सणसनगर, खडकवासला भागात डांबर पुरवठा करता येईल. तसेच कात्रज, गुजरवाडी, काेळेवाडी ते उंड्री पर्यंतच्या भागात त्वरीत डांबर पुरवठा केला जाऊ शकताे. त्याचप्रमाणे बिबवेवाडी, काेंढवा – येवलेवाडी, धनकवडी, सिंहगड रस्ता, वानवडी, वारजे – कर्वेनगर या क्षेत्रीय कार्यालयातंर्गत रस्ते, समाविष्ट गावांतील रस्त्यांसाठी डांबर पुरवठा करता येणार आहे.






