PUNE NEWS : पुण्यातील दोघा भावांचे 'लाठी-काठी' पारंपरिक खेळात यश(फोटो-सोशल मीडिया)
पुणे : पुण्यातील पोलिस पाल्य असलेल्या दोन भावांनी लाठी-काठी (स्टिक रोलिंग) या पारंपरिक खेळात जागतिक पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करत वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे. रूद्र योगेश ओव्हाळ (वय ११) आणि अथर्व योगेश ओव्हाळ (वय ७, रा. दोघेही सोमवार पेठ पोलिस लाईन). त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सिलेशन – इंग्लंड या प्रतिष्ठित बुकमध्ये आपले नाव कोरले आहे. या दोन्ही बालकलाकारांनी सलग १ तास, ११ मिनिटे आणि ११ सेकंद लाठी-काठी फिरवण्याचा पराक्रम यशस्वीपणे पूर्ण केला.
एवढ्या कमी वयात इतका दीर्घकाळ शारीरिक क्षमता, एकाग्रता व कौशल्य दाखवणे हे निश्चितच कौतुकास्पद मानले जात आहे. विशेष बाब म्हणजे हे दोघेही पोलिस पाल्य असून त्यांच्या यशामुळे पोलिस दलातही आनंदाचे वातावरण आहे. या विक्रमासाठी रूद्र आणि अथर्व यांनी नियमित सराव, शिस्तबद्ध जीवनशैली आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कठोर मेहनत घेतली. त्यांच्या या यशामागे कुटुंबीयांचे, विशेषतः वडिलांचे प्रोत्साहन मोलाचे ठरले. या विक्रमाची नोंद झाल्यानंतर पुणे शहरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, अनेक क्रीडा प्रेमी आणि सामाजिक संघटनांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.






