पुणे स्वारगेट पोलिसांनी आगारातील अत्याचार प्रकरणाची माहिती दिली आहे (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : पुण्यामध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मध्यवर्ती भागातील स्वारगेट बसस्थानकामध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला. पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार करण्यात आला. पीडित तरुणीला फसवून तिला बसमध्ये बसवण्यात आला. त्यानंतर नराधम पळून गेला. या घटनेमुळे पुणे शहर हादरले आहे. याबाबत स्वारगेट पोलिसांनी अधिकची माहिती दिली आहे.
नेमकं घडलं काय?
स्वारगेट बस स्थानकावर घडलेला प्रसंग समोर आला आहे. या गुन्ह्यातील आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही. आज पोलिसांनी हा गुन्हा नेमका कसा घडला? तपास कसा सुरु आहे? या बद्दल माहिती दिली आहे. “पीडित तरुणी स्वारगेट बस स्थानकात बससाठी थांबली होती. त्यावेळी आरोपी तिथे गेला. गोड बोलून त्याने ओळख करुन घेतली. कुठे जाता म्हणून त्याने मुलीला विचारलं. मुलीने तिला फलटणला जायचे असल्याचे सांगितलं. त्यावर आरोपीने सातारा जाणारी बस इथे लागत नाही असं सांगितलं. त्यावर तरुणीने बस इथेच लागते असं त्याला सांगितलं”
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“त्यावर आरोपी त्या मुलीला म्हणाला की, बस इथे लागत नाही, मी तम्हाला दाखवतो असं म्हणाला. त्यानंतर ती मुलगी आरोपी सोबत बसच्या दिशेने जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे” असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. “मुलगी बस जवळ गेल्यानंतर त्याला म्हणाली की, बसमध्ये तर अंधार आहे. त्यावर आरोपीने तिला सांगितलं की, ही रात्रीची लेट बस आहे. सगळे लोक झोपले आहेत, हवं तर तू वर चढून टॉर्च मारुन बघं. ती मुलगी बसच्या आतमध्ये जाताच त्याने मागून दरवाजा बंद करुन घेतला आणि दुष्कृत्य केलं” अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
स्वारगेट पोलिसांनी पुढे सांगितले की, “त्यानंतर आरोपी आधी बसमधून उतरला. त्यापाठोपाठ दोन मिनिटांनी मुलगी उतरली. ती फलटणला जाणाऱ्या बसमध्ये बसली. तिने तिथून मित्राला फोन लावला. मित्राच्या सल्ल्यावरुन तिने लगेच स्वारगेट पोलीस स्टेशन गाठून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर लगेचच आम्ही कारवाई सुरु केली. “आम्ही सीसीटीव्ही फुटेज काढलं. आरोपीची ओळख पटली आहे. आरोपी शिरुर गावचा आहे. त्याच्यावर 392 चा गुन्हा दाखल आहे. आरोपीचा शोध सुरु आहे. कालपासून आठ टीम काम करत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुणे पोलिसांनी पीडित मुलीवर होणारा अत्याचार रोखता आला असता असे देखील सांगितले. आगारामध्ये थांबलेल्या बसमध्ये बलात्कार होतो, आजूबाजूला असणाऱ्या कोणत्याच चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट येत नाही? चूक चालकाची की वाहकाची? सिस्टिममध्ये त्रुटी आहेत असं वाटतं नाही का? या प्रश्नावर “पोलिसांच पेट्रोलिंग सुरु असतं. पण प्रत्येक बस पोलीस चेक करु शकत नाहीत. ही बस आतमध्ये होती. घटनेनंतर मुलगी बसमध्ये बसून निघून गेली. तिथे आरडाओरडा केला असता, तर तिला काही मदत मिळू शकली असती” असे मत पुणे पोलिसांनी व्यक्त केले आहे.