पुण्यात थंडीचा कडाका वाढला (फोटो- istockphoto)
पुणे शहरात हुडहुडी कायम
तीन दिवसांपासून थंडीचा जोर कायम
पुढील दोन दिवस किमान तापमान स्थिर राहणार
पुणे: पुणे शहरात गेल्या तीन दिवसांपासून सकाळच्या थंडीचा जोर कायम असून, किमान तापमानाचा (Weather) पारा सतत घसरत आहे. त्यामुळे पुणेकरांनी सोमवार, मंगळवार आणि बुधवार (ता.३) सलग तीन दिवस पहाटेच्या थंडीत हुडहुडी भरवणारा माहोल अनुभवला. तर पुढील दोन दिवस किमान तापमान स्थिर राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. वातावरणातील कोरडेपणा वाढल्याने आणि रात्रीच्या वेळी गारठा अधिक तीव्र झाल्याने हिवाळ्याची तीव्रता प्रकर्षाने जाणवत आहे.
शहर आणि परिसरात बुधवारी किमान तापमान सुमारे ११.५ अंश सेल्सिअस इतके तर कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहणार असून त्यानंतर मात्र किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे. परिणामी थंडीचा कडाका आणखी काही दिवस कायम राहील अशी शक्यता आहे.
पुणे आणि परिसरामध्ये गुरुवारी (ता. ४) किमान तापमानात किंचित वाढ होणार असून किमान तापमान १२ अंश सेल्सिअस इतके तर कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. मात्र शुक्रवारपासून (ता. ५) पुढील तीन दिवस कमाल आणि किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता असून कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान ११ अंश सेल्सिअस पर्यंत नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात शीतलहर
राज्यातील थंडीचा कडाका तीव्र होत असून पुन्हा एकदा किमान तापमानात मोठी घट होण्यास सुरुवात झाली आहे. म्हणूनच पुढील 48 तासांत थंडीची ही लाट अधिक तीव्र होणार आहे . यामध्ये पुणे अहिल्यानगर, नाशिक ,जळगाव, नंदुरबार, धुळे येथील किमान तापमान तीन ते चार अंशाने घसरेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. इतकंच नव्हे तर काही भागात पारा सात ते आठ अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता असल्यानं राज्यात थंडीची लाट आणखी तीव्र होणार आहे. मागील 24 तासांत उत्तर महाराष्ट्रात थंडीची कडाक्याची लाट आली असून , नाशिक जिल्ह्यात मंगळवारी किमान तापमान 10.3 अंशांवर होतं तर महाबळेश्वरमध्ये हा आकडा 12 अंशांवर होता. ज्यामुळं नाशिक महाबळेश्वरपेक्षाही थंड ठरत आहे.






