या कार्यक्रमाला एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या पुणे परिसरात होणार राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठाच्या पुणे परिसरात महर्षी कर्वे यांच्या कार्याची प्रेरणा विद्यार्थिनी व शिक्षकांना मिळावी, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून हा पुतळा साकारण्यात आला असून, कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
प्रा. उज्वला चक्रदेव म्हणाल्या की, महर्षी कर्वे यांचे वास्तव्य असलेल्या ‘कर्वे कुटीर’ या ऐतिहासिक वास्तूचे संग्रहालयात रूपांतर करण्यात आले आहे. या संग्रहालयात महर्षी आणि बाया कर्वे यांच्या स्त्री शिक्षणासाठीच्या कार्याचा चित्रमय इतिहास, माहितीपट, पुस्तके, वापरातील वस्तू आणि विविध स्मृतिचिन्हांचे जतन करण्यात आले असून, पुढील काळात संग्रहालयाचा अधिक विकास करण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे.
वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘महाकुंभ २.०’ हा महिला उद्योजक, उद्योगतज्ज्ञ, धोरणकर्ते आणि गुंतवणूकदार यांना एकत्र आणणारा उपक्रम ठरणार आहे. या व्यासपीठ द्वारे उद्योग संकल्पनेपासून बाजारपेठेपर्यंत मार्गदर्शन, सामाजिक समस्यांवरील संशोधनाला प्रोत्साहन, दिव्यांगांसाठी सहाय्यक तंत्रज्ञान, ग्रामीण कचरा व्यवस्थापन तसेच तळागाळातील प्रश्नांवरील नाविन्यपूर्ण प्रकल्पांना संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. निवडक प्रकल्पांना अनुदान, मार्गदर्शन आणि इन्क्यूबेशन सेंटरमध्ये संधी देण्याचाही उपक्रमात समावेश आहे. असे कुलगुरू यांनी सांगीतले.






