NCP 27th foundation Day: अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा पहिलाच वर्धापन दिन; सुनेत्रा पवार यांची 'एक्स'वर अत्यंत भावूक पोस्ट
NCP 27th foundation Day: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. पण अजित पवार यांच्या कुटुंबियांच्याच नव्हे तर त्यांच्या सर्व चाहते आणि समर्थकांचेही डोळे दादांच्या आठवणीने भरून आले आहेत. शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार यांच्या नेतृत्त्वात पक्षाने भाजपला समर्थन दिले. अजित पवार यांचा एक गट महायुतीत सामील झाला. त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन राष्ट्रवादीचे वर्धापन दिन साजरे होऊ लागले. पण जानेवारी २०२६ मध्ये अजित पवार यांच्यावर काळाने घाला घातला. बारामती जवळ विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याचे संपूर्ण महाराष्ट्रालाच जणू सुतक पडले होते. कित्येकत दिवस पवार कुटुंबियांच्या डोळ्यातील अश्रू थांबले नव्हते.
पण आज (10 जून) राष्ट्रवदी काँग्रेसचा वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या ट्विटर एक्स अकाऊंटवर एक भावूक पोस्ट केली आहे. “आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनी, दादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत, त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करूया, असं आवाहन त्यांनी या पोस्टद्वारे केलं आहे. प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी नव्या जोमानं काम करण्याचा संकल्प करूया,” असंही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्ष परिवारातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि हितचिंतकांना मनःपूर्वक शुभेच्छा!
शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा तसेच स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेल्या सुसंस्कृत, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख राजकारणाच्या पायावर उभा राहिलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज आपल्या यशस्वी प्रवासाची २७ वर्षे पूर्ण करत आहे. या प्रवासात असंख्य नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेने पक्षाला दिलेली साथ हीच आमची खरी ताकद राहिली आहे. पण यंदाचा वर्धापन दिन साजरा करताना मनात एक वेगळीच भावना दाटून येते. कारण आज आदरणीय अजित दादा आपल्यात नाहीत…
सभागृहात भाषणं होतील, कार्यकर्त्यांचे मेळावे होतील, पक्षाचा झेंडा तितक्याच अभिमानानं फडकेल, पण प्रत्येक क्षणी एक पोकळी जाणवत राहील. दादा हे फक्त पक्षाचे नेते नव्हते, तर ते आधारवड होते. कार्यकर्त्यांच्या, सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात धावून जाणारे, संकटात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे, चूक झाली तर कान धरून समजावणारे आणि चांगलं काम केलं तर पाठीवर कौतुकाची थाप देणारे दादा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनले होते. त्यांनी जपलेला माणूस हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनी, दादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत, त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करूया. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन आणि स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुरोगामी वाटेवर चालून अधिक सक्षम, समृद्ध आणि प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी नव्या जोमानं काम करण्याचा संकल्प करूया.”






