संग्रहित फोटो
पिंपरी : आर्थिक संकटाची टांगती तलवार आणि आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली अस्थिरता लक्षात घेता, नवीन प्रकल्प व सल्लागार नियुक्तीवर बंदी घालण्याचे आदेश पिंपरी- चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले होते. मात्र, आयुक्तांच्या या आदेशाला पायदळी तुडवत, स्थायी समितीने छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर हा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पुतळा प्रकल्पावर आतापर्यंत ९२ कोटींचा खर्च
बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या १०० फूट उंचीच्या पुतळ्यासाठी महापालिकेने आतापर्यंत चार टप्प्यांत तब्बल ९२ कोटी ७६ लाख रुपयांच्या निविदा मंजूर केल्या आहेत.
टप्पा १: चौथरा बांधकामासाठी १२ कोटी ४७ लाख रुपये.
टप्पा २: पुतळा उभारणीसाठी ३२ कोटी ८४ लाख रुपये.
टप्पा ३: उर्वरित चौथरा व सुशोभीकरणासाठी १५ कोटी ११ लाख रुपये.
टप्पा ४: उर्वरित जागेतील स्थापत्य व विद्युत कामांसाठी ३२ कोटी ३४ लाख रुपये.
हे सुद्धा वाचा : २३ गावांचा विकास आराखडा आता पुणे महापालिका तयार करणार; ५ वर्षांची प्रतीक्षा संपणार?
‘बेकायदा कारभार लपवण्यासाठी जुन्याच सल्लागाराची निवड’
सल्लागार नियुक्तीच्या या प्रस्तावाला शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) तीव्र विरोध दर्शवला आहे. प्रकल्पाच्या टप्पा चारच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनागोंदी झाल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्या सुलभा उबाळे यांनी केला आहे. “प्रकल्पाचे अंदाजपत्रक आणि अटी-शर्ती तयार करताना संबंधित सल्लागाराने चुकीच्या पद्धतीचा अवलंब केला आहे. आता आपला बेकायदेशीर कारभार लपवण्यासाठीच पुन्हा त्याच सल्लागाराची नियुक्ती केली जात आहे,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी करत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे.
हे सुद्धा वाचा : दौंडच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस; बळीराजा सुखवला! खरीप हंगामातील शेती कामांना वेग






