Rohit Pawar on Chakan MIDC: आवाज उठवणाऱ्या उद्योजकांना धमक्या ; चाकण MIDC च्या पाहणीनंतर रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप
बारामती : अजित पवारांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघासाठी आज पोटनिवडणूक होत आहे. सुनेत्रा पवार ही निवडणूक लढत असल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष बारामतीकडे आहे. सर्व मोठ्या पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला असल्याने त्या निवडून येणार हे निश्चित आहे. मात्र काही अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने निवडणूक बिनविरोध होऊ शकलेली नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला असून, रोहित पवारांनी आज सकाळी मतदानाचा हक्क बजावला आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
रोहित पवार म्हणाले की, अजितदादांच्या प्रति मनात जो आदर आहे, प्रेम आहे, त्या गोष्टींकडे पाहून मोठ्या बहुसंख्येने आपण मतदानाला आले पाहिजे. मला विश्वास आहे की, बारामतीकर नक्कीच मतदानाला येतील. काही ठिकाणी आम्हाला कळाले आहे की, लोकांची नावे ज्या बुथवर पाहिजे त्या ठिकाणी न येता लांबच्या बुथवर आलेली आहेत. मला लोकांना सांगायचे आहे की, दादांचे कार्यकर्ते आपल्या सेवेसाठी त्या प्रभागात असतील. त्यांना तुम्ही भेटा आणि तुमचे नाव कुठे आले आहे ते जाणून घ्या. बूथ लांब असले तरी मतदान करा आणि सुनेत्रा काकींना खूप चांगल्या मतांनी तुम्ही निवडून द्या, असे त्यांनी म्हटले.
अजितदादांच्या आठवणीबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, अजित दादा आणि शरद पवार यांचा आम्ही लहान असल्यापासून प्रचार करायचो. कधीकधी मी सायकल रॅलीमध्ये सुद्धा सहभाग घेतला आहे. लहान असताना मी तिथे भाषण करत नव्हतो. परंतु, आई-वडिलांसोबत जिथे जाता येईल तिथे जात होतो आणि प्रचार करत होतो. अजितदादा तसे बोलायला कडक होते. पण, मनातून एकदम मवाळ होते. नेहमीच ते मला म्हणायचे काय चिरंजीव काय चालले आहे, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
सुनेत्रा काकींना अडीच लाख मतांनी निवडून देतील
रोहित पवार 2029 साली बारामतीतून निवडणूक लढणार का? असे विचारले असता मी कर्जत जामखेडमधून 2019 साली लढलो. 2024 साली देखील तिथूनच लढलो. तिथे वेगळ्या पद्धतीचा दबाव आहे. रोहित पवार परत विधिमंडळात येऊ नये यासाठी आर्थिक ताकद 2024 साली देखील लावली गेली. आता पण त्या बाबतीत तयारी सुरू आहे. पण, मी तिसऱ्यांदा सुद्धा कर्जत जामखेडमधूनच निवडणूक लढणार असल्याचे स्पष्टीकरण रोहित पवार यांनी दिले. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या किती मतांनी निवडून येतील? याबाबत विचारले असता मला विश्वास आहे की, बारामतीचे लोक सुनेत्रा काकींना अडीच लाख मतांनी निवडून देतील, असा आकडाच त्यांनी सांगितला.






