अलिबाग : नागरिकांनी केलेल्या मतांची चोरी केल्यामुळे सत्ताधारी सरकार सत्तेत आलं आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यामुळे आता या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. याच पार्श्वभूमीवर रायगडमध्ये राज्य सरकारविरोधात काँग्रेसने कॅन्डल मार्च काढला.
मतदार यादीतील घोळ आणि मतदार चोरीच्या आरोपांवरून रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे १४ ऑगस्ट रोजी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर कॅन्डल मार्च आणि मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. “मतदान चोर, खुर्ची सोड” या घोषणांनी अलिबाग शहर दणाणून गेले.अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी उघड केलेल्या मतदार यादीतील गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन झाले. जिल्हा मुख्यालय अलिबाग येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मशाल मोर्चाची सुरुवात झाली आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.
या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र ठाकूर, सरचिटणीस ॲड श्रद्धा ठाकूर, सरचिटणीस नंदा म्हात्रे, काँग्रेस तालुका अध्यक्ष भास्कर चव्हाण, ज्येष्ठ नेते तोडणकर गुरुजी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, महिला आघाडी, युवक काँग्रेस, विविध आघाड्या व सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलकांनी भारतीय जनता पक्षावर निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार यादीत फेरफार करून सत्तेवर गैरमार्गाने येण्याचा आरोप केला.काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मतचोरी हा केवळ राजकीय मुद्दा नसून लोकशाही प्रक्रियेवर घाला असल्याचे सांगत भविष्यातही हा लढा अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.