कर्जतच्या पळसदरीत दरड कोसळली; पाच वाहने मातीखाली, मुख्य रस्ता बंद
कर्जत तालुक्यातील पळसदरी-ठाकूरवाडी येथे आज पहाटेच्या सुमारास अचानक दरड कोसळल्याची घटना घडली.या दुर्घटनेत दोन चारचाकी आणि तीन दुचाकी वाहने ढिगाऱ्याखाली दाबले गेल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने आणि वाहनांमध्ये कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. डोंगरावरील वस्तीला जाणाऱ्या दुर्गम रस्त्यावर वाहने नेणे शक्य नसल्याने, स्थानिक नागरिकांनी आपली वाहने रस्त्यालगत असलेल्या एका शेडमध्ये उभी केली होती. पहाटेच्या वेळी डोंगराचा मोठा भाग खचून प्रचंड प्रमाणात माती आणि दगड-धोंडे या शेडवर व रस्त्यावर आले. या ढिगाऱ्यामुळे वस्तीकडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे बंद झाला असून, काही ठिकाणी रस्त्याचा भागही खचला आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासकीय यंत्रणेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, मंडळ अधिकारी वैशाली पाटील, तलाठी शितल मंदाडे, ग्रामसेवक अनिल राठोड, पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक शरद रोकडे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोचून तातडीने जेसीबीच्या साह्याने रस्त्यावरील दरडीचा मलबा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
पावसाच जोर कायम असल्याने डोंगरावरून आणखी दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेता, प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ठाकूरवाडीतील रहिवाशांना तातडीने ‘पळसदरी मठामध्ये’ सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले आहे.
आमदार महेंद्र थोरवे यांनी सकाळी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.त्यावेळी आगामी काळात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन दिले.
दरम्यान कर्जत-खोपोली विभागात प्रवास करणाऱ्यांनी रेल्वे वेबसाइट, NTES अॅप किंवा स्थानिक स्टेशन मास्टरशी संपर्क साधावा. पावसाळी हवामानात प्रवास करताना सावधगिरी बाळगावी आणि सुरक्षित अंतर राखावे. दरम्यान, कर्जत शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीला आलेल्या पुराचा फटका काही भागाला बसला.त्यात मुद्रे नाना मास्तर नगर पासून पुढील भागात असलेल्या मालवाडी परिसरातून वाहणाऱ्या उल्हास नदीचे पाणी आजुबाजूच्या लोकवस्तीत घुसले.त्याचवेळी नाना मास्तर नगर मधील नदीलगत असलेल्या भागाला पुराचा धोका निर्माण झाल्याने कर्जत नगरपरिषद कडून खबरदारी घेण्यात आली.त्याचवेळी शहरातील शनी मंदिर परिसरात देखील पुराच्या पाण्याचा फटका बसला तर बामचा मळा भागातून पुराचे पाणी पुढे येत होते.






