शिंदे गटाचा सरपंच पोलिसांच्या रडारवर, जिवघेणा हल्ला आणि हत्येच्या कट
अनिल हरिषचंद्र देशमुख यांच्यावर जिवघेणा हल्ला केल्या प्रकरणी जुन महिन्यात कर्जत पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असतांना पाच जणांनी पोलीसांसमोर आत्मसमर्पण केले. पोलीसांनी सर्वांना ताब्यात घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली. मात्र चौकशी दरम्यान पळसदरीचे सरपंच जयेंद्र देशमुख यांनी पैशाचे आणि नोकरी देण्याचे अमिष दाखवून पाचही जणांना हा गुन्हा अंगावर घेण्यास सांगितल्याचे पोलीसांना सांगितले. त्यामुळे पोलीसांनी ताब्यात घेतलेले पाचही आरोपी डमी असल्याचे समोर आले.
त्यामुळे प्रकरणाची गुंतागुंत अधिकच वाढली. हीबाब लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिले. ३१ जुलै २०२४ रोजी हा गुन्हा समांतर तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला. पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी दहा जणांच्या विशेष पथकाची नियुक्ती केली.
सिसिटीव्ही, तांत्रिक माहिती यांच्या विश्लेषणातून पाच आरोपी निष्पन्न केले. यानंतर कल्याण येथून शुभम राजेंद्र कांगणे, नंदेश मिलिंद खताते या दोन आरोपींना अटक केली. त्यांनी अन्य तीन जणांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबूली दिली. सरपंच जयेंद्र देशमुख आणि प्रशांत देशमुख यांनी सुपारी देऊन हा गुन्हा करण्यास सांगीतल्याचे समोर आले आहे. आता सरपंच जयेंद्र देशमुख यांच्यासह उर्वरीत पाच आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत अशी माहिती अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी दिली.