शेकाप आणि मराठा सेवा संघाचे पोलीस ठाण्यात दिले निवेदन; प्रशांत कोरटकर विरोधात कारवाईची मागणी
कर्जत/ संतोष पेरणे : नागपूरच्या प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहे.त्याबाबत शिवप्रेमी यांच्या भावना दुखावल्या असून संबंधित वक्तव्य करणारे कोरटकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन शेतकरी कामगार पक्ष आणि मराठा सेवा संघाने कर्जत पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे.
कर्जत मराठा सेवा संघाने कोरटकर यांच्यावर महापुरुषांची बदनामी, धार्मिक भावना दुखावणे, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि जीवे मारण्याच्या धमकीचे आरोप करत तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. संघटनेने राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा कायदेशीर मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. सदर प्रकरणाचे ऑडिओ पुरावे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्या सोशल मीडियावर उपलब्ध असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यावेळी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागपूर मधील प्रशांत कोरटकर या व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन कॉल करुन छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व माँसाहेब जिजाऊ यांच्याबद्दल गालिच्छ वक्तव्ये करुन बदनामी केली आहे. तसेच संबंधित व्यक्तीने विकृत लेखक जेम्स लेन याने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि माँसाहेब जिजाऊ यांच्याबद्दलच्या अत्यंत विकृत लिखाणाचे समर्थन करुन तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत.
मराठा समाजाला शिवीगाळ करुन सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन सदर व्यक्तीने ही वक्तव्ये व धमकी देत असल्याने हे प्रकरण संवेदनशील आहे.
सदर ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग इंद्रजीत सावंत यांच्या वॉलवर उपलब्ध आहे. राज्य सरकार, गृह विभाग व पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्रशांत कोरटकर (नागपूर) या व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करुन त्याला अटक करावी आणि त्याच्यावर कठोर कायदेशीर कार्यवाही करावी. या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करुन घेण्यात किंवा कार्यवाही करण्याबाबत गांभीर्य दाखवले नाही. तर भारतीय शेतवकरी कामगार पक्ष व सर्व शिवप्रेमींच्या वतीने राज्यभर कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल.ही दोन्ही निवेदन पोलिस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी स्वीकारले.