सौजन्य - नवराष्ट्र टीम
सोलापूर/ शेखर गोतसुर्वे : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मतदार संघ बहुचर्चीत ठरला आहे. या मतदार संघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असे टशन पाहावयास मिळत आहे. पारंपरिक प्रतिस्पर्ध्यात कडवी लढत होत आहे. आमदार राजेंद्र राऊत शिवसेना शिंदे गट तर माजी पालकमंत्री दिलीप सोपल शिवसेना उबाठा गटातून निवडणूकीच्या रिंगणात उभे आहेत. २० उमेदवारांपैकी वादळी रणसंग्रमात राऊत, सोपल आमने -सामने आल्याने चर्चेने सर्वाधीक जोर धरली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बार्शी मतदारसंघात विशेष लक्ष घालून येथील सभा गाजविल्या आहेत.
यंदा मनोज जरांगे व आमदार राजेंद्र राऊत यांच्यामुळे राज्यात बार्शी मतदार संघ लक्षवेधी ठरला आहे. त्यातच, माजी मंत्री दिलीप सोपल व आमदार राजेंद्र राऊत यांच्यातच खरी लढत होत आहे. बार्शी विधानसभा मतदारसंघात दिलीप सोपल यंदा शिवसेना उबाठा म्हणजेच ठाकरेंच्या मशालीकडून निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर, आमदार राजेंद्र राऊत महायुतीचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे येथील मतदारसंघात कॉंटे की लढत होणार आहे.
आमदार राऊत यांनी गत ५ वर्षांच्या काळात केलेल्या विकासकामांच्या आणि खेचून आणलेल्या निधीच्या जोरावर ते जतनेकडे जात आहेत. तर, तालुक्यातील जनतेला मोकळा श्वास घेता यावा, म्हणून आपण मैदानात आहोत, असे म्हणत दिलीप सोपल यांनी राऊतांवर अप्रत्यक्षपणे टीका केलीय. मतदारसंघात गेल्या २५ वर्षांपासून थेट सोपल विरुद्ध राऊत असाचं सामना होत आहे. बार्शीत राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे नेते आणि माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांची यंदा दिलीप सोपल यांना साथ आहे. मात्र, गत २०१९च्या निवडणुकीत त्यांनी आमदार राऊत यांच्यासाठी काम केलं होते. त्यामुळे, त्यांचा इम्पॅक्ट मतदारसंघात होईल का हेही पाहावे लागेल.
यंदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापले असताना, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगें सोबत थेट पंगा घेतल्याने या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच, येथील मतदारसंघात मनोज जरांगे फॅक्टरचा परिणाम होईल का, त्याचा फटका कोणाला बसेल हे निकालाच्या दिवशीच समजणार आहे.
गत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बार्शी मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली. महायुतीत शिवसेनेकडून माजी मंत्री दिलीप सोपल यांना तिकीट मिळालं होते. सोपल यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवारांची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. तर, भाजपकडून इच्छुक असलेल्या राजेंद्र राऊत यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यामुळे, येथील मतदारसंघात आघाडीकडून निरंजन भूमकर यांना तिकीट देण्यात आले होते. भूमकर यांना बार्शी तालुक्यातील वैराग भागात जनाधार आहे. त्यामुळे, भूमकर यांना तिकीट देऊन शरद पवार व अजित पवार यांनी त्यांच्यासाठी सभा ही घेतल्या होत्या. दरम्यान, येथील निवडणुकीत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत हे ३०७६ मतांनी विजयी झाले. तर, भूमकर यांच्या उमेदवारीचा फटका सोपल यांना बसला होता. यंदा ही सोपल विरुद्ध राऊत यांच्यात तगडी फाईट असल्याचे दिसून येते.
लोकसभेला ओमराजेंना मताधिक्य
लोकसभा निवडणुकीत बार्शी मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना मोठे मताधिक्य मिळाले आहे. ओमराजे निंबाळकर यांनी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा ३ लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला. त्यात, बार्शी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना महाविकास आघाडीच्या ओमराजे निंबाळकर यांना तब्बल ५५ हजारांचं मताधिक्य आहे. बार्शी मतदारसंघात त्यांच्यासाठी दिलीप सोपल यांच्या नेतृत्वात प्रचाराची धुरा सांभाळण्यात आली होती. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचं गणित वेगळं असतं, असाही राजकीय अंदाज काहीजण व्यक्त करतात.
बार्शी मतदारसंघात ३लाख ३२ हजार मतदान
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख, ३२ हजार २८मतदार नोंदले गेले आहेत. त्यापैकी १ लाख ७० हजार ९३० पुरुष आणि १लाख, ६१ हजार, ५५ महिला मतदारांचा समावेश आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदारसंख्येत यंदा २.५८ टक्के वाढ झाली आहे.
दिलीप सोपल नवव्यांदा रिंगणात
बार्शी विधानसभा मतदार संघासाठी माजी मंत्री दिलीप सोपल १९८५ पासून बार्शीच्या राजकारणात सक्रिय आहेत. आजपर्यंत त्यांनी या विधानसभा मतदार संघात सलग आठ वेळा निवडणूक लढवली. आणि त्यापैकी २००४ आणि २०१९ वगळता सहा वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. १९९५ मध्ये युती सरकारच्या काळात ते मंत्री होते. तर २०१४ च्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा त्यांना होता. सध्या दिलीप सोपल हे बार्शी विधानसभा मतदारसंघातून नवव्यंदा निवडणूक रिंगणात असून महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ते निवडणूक लढवीत आहेत. त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी शिवसेनेचे राजेंद्र राऊत यांच्याशी त्यांचा सामना रंगतदार ठरत आहे.