बिबट्याच्या पिल्लाचे यशस्वी रेस्क्यू (फोटो- सोशल मिडिया)
बिबट्याच्या पिल्लाची यशस्वी सुटका
बिबट्याला जेरबंद करणे होते अत्यंत जोखमीचे
बिबट्यास नैसर्गिक अधिवासात केले मुक्त
चिपळूण: नुकतेच आईपासून विमुक्त होऊन स्वतः शिकारीसाठी बाहेर पडलेला बिबट्याचा पिल्लू कात्रोळी येथील एका घरात लोखंडी खुराड्यात शिरला. त्याला सुखरूप बाहेर पडता आले नाही. अखेर वन विभागाने रेस्क्यू करून त्याची सुटका केली. बुधवारी मध्यरात्री दोन वाजता हा प्रकार घडला. मध्यरात्री कात्रोळी लायकवाडी येथील सुरेश जाधव यांच्या कोंबडीच्या खुराड्यात बिबट्या शिरला होता. हा खुराडा लोखंडी होता. त्याच्या तळ बाजूला असलेला पत्रा फाटलेला होता.
त्यामधून बिबट्या आत शिरला, त्यानतर कोंबड्यानी आरडा-ओरड करायला सुरुवात केली. झोपेत असलेले घरमालक सुरेश जाधवही जागी झाले. त्यानी लाईट लावून बघितल्यानंतर कोंबड्यांच्या खुराडात बिबट्या असल्याचे त्यांना आढळून आले. – त्यानी तत्काळ गावचे सरपंच दीपक निवळकर यांना माहिती दिली. निवळकर यांनी चिपळूणचे परिक्षेत्र वन अधिकारी सरवर खान यांना यासंदर्भात कळविले. – त्यानंतर खान है आधुनिक पिंजरा, वनपाल दयानंद सावंत, वनरक्षक राहुल गुंठे, कृष्णा इरमले, वाहनचालक नंदकुमार कदम यांना घेऊन घटनास्थळी पोचले. तोपर्यंत गावातील लोक ही त्या ठिकाणी जमले होते.
बारामती तालुक्यात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण; पिंजरा लावण्याची केली मागणी
वनविभागाच्या रेस्क्यू टीमने वस्तुस्थितीची पाहणी केली. यावेळी सुरेश जाधव यांच्या घरातील कोंबड्यांचा खुराडा घरच्या अडचणीच्या बाजूला होता त्याठिकाणी पिंजरा लावणे कठीण होते व खुराड्याची परस्थिती पाहता बिबट्याला जेरबंद करणे अती जोखमीचे ठरत होते. रेस्क्यू टीमने खुराडाच्या तळ बाजूला लाकडी फळ्या एकत्र केल्या. त्या लोखंडी ग्रीलच्या साह्याने बांधून घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने उचलून मोकळ्या जागेवर ठेवला. नंतर खुराडासमोर पिजरा लावून खुरड्याचे दार ग्राईंडरच्या मदतीने तोडण्यात आले. परंतु बिबट्या खुराड्यातून बाहेर येऊन पिंजऱ्यात जात नव्हता.
अथक प्रयत्नानंतर तो पिंजऱ्यात गेला आणि ग्रामस्थांसह वनविभागाच्या पथकाने सुटकेचा श्वास घेतला. बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर कणसे यांनी पाहणी केली असता सदर बिबट्या सुस्थितीत आल्याची खात्री झाल्यानंतर त्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार बिबट्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. याबाबत सरवर खान परिक्षेत्र वन अधिकारी चिपळूण यांनी, विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाईंच्या मार्गदर्शनाखाली या बिबट्याची यशस्वी रेस्क्यू करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले, असे सांगितले.






