नाशिक : सत्तासंघर्षाबाबत सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर जल्लाेष आणि फटाक्यांची आतषबाजी करणाऱ्या शिवसेना (शिंदे गट) पक्षावर जाेरदार प्रहार करत ‘लाेकशाहीच्या छाताडावर नागड्यांचा नाच’, अशा शब्दात उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
नाशिक येथे खासगी दाैऱ्यावर आलेल्या खा. राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधत शिंदे गट आणि भाजपवर कडाडून टीका केली. न्यायालयाच्या निर्णयाचे चुकीचे विश्लेषण भाजप आणि शिंदे गटाकडून केले जात असून, न्यायालयाने सरकारचे सर्वच बेकायदा ठरवल्याने नित्तीमत्तेचे एकही वस्त्र या नागड्यांच्या अंगावर शिल्लक राहिलेले नसल्याचे ते म्हणाले. न्यायालयाने गाेगावले यांची प्रताेपपदी निवड बेकायदा ठरवल्याने त्यांचे अादेशही बेकायदा ठरले आहेत. तत्कालीन राज्यपाल काेश्यारी यांचे सर्वच निर्णय बेकायदेशीर ठरवले असे असताना भाजप आणि शिंदे गट एकमेकांना पेढे भरवून जल्लाेष साजरा करणे म्हणजे निर्लज्जपणाचा कलस झाल्याची टीकाही राऊतांनी केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे चुकीचे विश्लेषण केल्याने त्यांनी पुन्हा एकदा कायद्याची पुस्तके चाळावी, असा सल्लाही राऊत यांनी दिला. राऊत यांनी न्यायालयाचे आभार मानत न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकार अपात्र ठरले असून, सरकार वाचले असे म्हणणारे न्यायालयाचा अवमान करत असल्याचा आराेप राऊत यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र माेदी हे केंद्र सरकार घटनेचे रखवालदार असा उल्लेख करतात. परंतु, महाराष्ट्रात तीच लाेकशाही पायदळी तुडवली जात असल्याचे त्यांना दिसत नाही का, असा प्रश्न उपस्थित करत भविष्यात माेदी यांना या सर्व प्रश्नांना जगाला उत्तरे द्यावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. राजकारणातून नैतिकता नष्ट झाली असून, त्याचे मारक भाजप असल्याचा अाराेपही त्यांनी केला.
मरण तीन महिने पुढे ढकलले
शिंदे गटाच्या सरकारचा अंत निश्चित आहे, असा दावा करत त्यांचे अाजचे मरण पुढे तीन महिन्यांनी ढकलले गेले आहे. कारण न्यायालयाच्या निकालानुसार अध्यक्ष नार्वेकर यांना ९० दिवसात १६ अामदार अपात्रतेविषयी निर्णय घ्यावाच लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले. नार्वेकर यांनी आजवर अनेक पक्ष बदलले आहे. जिकडे सत्ता तिकडे नार्वेकर असे समिकरण असल्याने त्यांना राजकारणात स्थैर्य नाही. त्यांच्याकडे अधिकार असले तरी सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानुसारच त्यांना निर्णय द्यावा लागणार असल्याचे खा. राऊत म्हणाले.
अादेश पाळाल तर खबरदार
न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य सरकार बेकायदेशीर आहे. यामुळे या बेकायदेशीर सरकारचे आदेश प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पाळू नये, असे सांगत आदेश पाळल्यास तुम्ही देखील अडचणीत याल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी माजी राज्यपालांचा धाेतर साेडून पळून गेलेले असा उल्लेख केला.
ठाकरेंचा राजीनामा नैतिकतेला धरून
उध्दव ठाकरे यांनी राजीनामा देण्यामागील कारण काय असा प्रश्न विचारला असता गद्दारांसमाेर त्यांना चाचणीला सामाेरे जायचे नव्हते आणि त्यांनी दिलेला राजीनामा हा नैतिकतेला धरून हाेता, असे सांगत लाज शिल्लक असेल तर शिंदे भाजप सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी करत राज्य सरकारचा बेशरम आणि निर्लज्ज सरकार, असा उल्लेख खासदार राऊतांनी केला.