निधीच्या तुटवड्याचा एसटी कर्मचाऱ्यांना बसणार फटका; मार्चचे वेतन रखडण्याचीही शक्यता (File Photo : ST Bus)
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दर महिन्याला सरकारकडून निधी देण्यात येतो. पण गेले अनेक महिने मागणीप्रमाणे निधी येत नसल्याने कर्मचाऱ्यांना नक्त वेतन देण्यात येत असून, या महिन्यात पुन्हा नक्त वेतन देण्याइतका सुद्धा निधी सरकारकडून आलेला नाही. त्यातच एसटी बँकेला 40 कोटी रुपये इतकी रक्कम द्यावी लागल्याने एसटी प्रशासन बुचकळ्यात पडले असून, या महिन्यात कर्मचाऱ्यांचे वेतन रखडण्याची शक्यता आहे.
महामंडळाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारकडून दर महिन्याला सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम देण्यात येते. मात्र, ही रक्कम पूर्ण येत नसल्याने कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देण्यात अडचणी येतात. पी.एफ., ग्रॅज्युटी, बँक कर्ज, एल.आय. सी., अशी ही साधारण ३५०० कोटी रुपयांची देणी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात होऊन सुद्धा त्या-त्या संस्थांकडे वर्ग केलेली नाही. कर्मचाऱ्यांची व महामंडळाची एकूण थकीत देणी रक्कम ही सात हजार कोटी रुपयांच्यावर गेली आहे.
सरकारकडून निधीच नाही
मार्च महिन्याचे वेतन व इतर थकीत देणी देण्यासाठी महामंडळाने राज्य सरकारकडे ९२५ कोटी रुपयांचा निधी मागितला होता. पण प्रत्यक्षात मात्र २७२ कोटी ९६ लाख रुपये एवढाच निधी मिळाला आहे. त्यातील ४० कोटी रुपये कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड रक्कम एसटी बँकेकडे भरावी लागली.
कर्मचाऱ्यांना नक्त वेतन देण्यासाठी २७७ कोटी
८७ हजार कर्मचाऱ्यांना नक्त वेतन देण्यासाठी २७७ कोटी रुपये तर पूर्ण वेतन देण्यासाठी ४६० कोटी रुपये लागतात. दीर्घकालीन संपानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला व खर्चाला कमी पडणारी रक्कम शासन देईल, असे न्यायालयात कबूल केले होते. पण त्यानंतर एकाही महिन्यात आवश्यक निधी सरकारने दिलेला नाही.
कर्मचाऱ्यांत असंतोष
दर महिन्याला वेळेत वेतन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. आर्थिक विवंचनेमुळे कर्मचारी तणावात काम करीत असून त्याचा परिणाम गुणवत्तेवर व महामंडळाच्या एकूण कामकाजावर होत असल्याची माहिती महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे.