सातारा नगरपरिषदेची उद्या सर्वसाधारण सभा (Photo Credit- X)
सभेतील प्रमुख विषयांमध्ये सन २०२७-२८ ते २०३०-३१ या कालावधीसाठीच्या चतुर्थ वार्षिक मालमत्ता कर आकारणीचा प्रस्ताव महत्त्वाचा मानला जात आहे. यासोबतच नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी आवश्यक उच्चदाब (एचटी) वीज जोडणी, शहरातील प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, डेकोरेटिव्ह पोल आणि हायमास्ट उभारणी, तसेच मोती तलाव परिसराच्या विद्युतीकरणासंदर्भातील प्रस्तावांवरही चर्चा होणार आहे.
बीपीसीएलच्या गॅस पाइपलाइन प्रकल्पासाठी विविध भागांमध्ये करण्यात आलेल्या रस्ते खोदाईनंतर दुरुस्तीच्या कामासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव सभेपुढे येणार आहे. रस्त्यांच्या गुणवत्तेसह कामाची जबाबदारी, खर्च आणि नागरिकांच्या तक्रारी या मुद्द्यांवर नगरसेवकांकडून सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.
याशिवाय विस्तारित पाणीपुरवठा योजना, सांबरवाडी जलशुद्धीकरण केंद्राचे आधुनिकीकरण, सोनगाव घनकचरा प्रकल्प, कचरा व्यवस्थापनासाठी यंत्रसामग्री खरेदी, आधुनिक मत्स्यबाजार, दिव्यांगांसाठी स्वतंत्र झोन, वारसा हक्कातील सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, सुरक्षा रक्षक व करारावरील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवामुदतवाढीचे प्रस्तावही सभेत विचाराधीन असणार आहेत.
नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विकासकामांना गती, आर्थिक नियोजन आणि नागरिकांशी संबंधित निर्णय यावर सभेत सखोल चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पालिकेतील विविध विकासकामे, महसूल वाढीचे प्रस्ताव, शहरातील पायाभूत सुविधांची उभारणी आणि प्रलंबित योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात होणारे निर्णय आगामी काळातील शहराच्या विकासासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत. त्यामुळे या सर्वसाधारण सभेत प्रशासन आणि नगरसेवक कोणती भूमिका घेतात, याकडे नागरिकांचे विशेष लक्ष लागले आहे.






