मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय, सावंतवाडी स्थानकाचे नाव बदलणार, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 'हा' मोठा निर्णय
आज (मंगळवार, २६ मे) पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य शासनाकडून मोठे निर्णय घेण्यात आले असून आता कोकण रेल्वेमधील महत्वाचे स्थानक असलेल्या सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव.देण्यात येणार आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे. याशिवाय सामान्य प्रशासन विभाग, उद्योग विभाग आणि महसूल व मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागात देखील अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हि बैठक पार पडली.
सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव (परिवहन विभाग)
सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी देण्याचा निर्णय करण्यात आला. कोकणातील जनतेची अनेक वर्षांची मागणी मार्गी लागली आहे. नामकरणाबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ (सामान्य प्रशासन विभाग)
शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ मिळणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणार्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मध्ये सूधारणेस मान्यता देण्यात आली आहे.
डोंबिवलीतील सोनारपाड्यातील पिंपळेश्वर मंदिराला जमीन.(उद्योग विभाग)
डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील मौजे सागाव सोनारपाडा (ता. कल्याण, जि. ठाणे) येथील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला ४ एकर २५ गुंठे जमीन मिळणार आहे. या जमिनीवरील मंदिर ट्रस्टचा वापर नियमित करण्यास व ही जमीन ट्रस्टला नाममात्र दरात देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
नवीन नागपूर व नवीन बाह्य वळण रस्त्यासाठी खरेदी करायच्या जमिनीसाठीचे मुद्रांक शुल्क माफ (महसूल व मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग)
नवीन नागपूर व नवीन बाह्य वळण रस्त्यासाठी खरेदी करायच्या जमिनीसाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मौजे गोदणी आणि मौजे लाडगाव (रीठी) (ता. हिंगणा, जि. नागपूर) येथील खाजगी जमीन नवीन नागपूर व नवीन बाह्य वळण रस्ता प्रकल्पासाठी वाटाघाटीने थेट खरेदी करावी लागणार. या व्यवहारावरील मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क माफ करण्यास मान्यता देण्यात आली आहे.






