Sharad Pawar यांची हर्षवर्धन सदगीरला आंतरराष्ट्रीय तयारीसाठी १२ लाखांची शिष्यवृत्ती
फिरोज मुलाणी, औंध : महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील आश्रयदाते कुस्तीगीर परिषदेचे माजी अध्यक्ष जेष्ठ नेते खा शरद पवार यांनी डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याला पुढील दोन वर्षे आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा सराव करणे आणि खुराकासाठी १२ लाख रुपये आर्थिक मदत देऊन हर्षवर्धनच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. पवार यांनी दिलेल्या आर्थिक मदतीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सरावासाठी हर्षवर्धनला मोठे आर्थिक बळ मिळाले आहे.
डबल महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेतल्यावर हर्षवर्धन सदगीर,आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचे संस्थापक अर्जूनवीर काकासाहेब पवार, उद्योजक मोहसीन बागवान, शासकीय कुस्ती प्रशिक्षक शिवाजी कोळी पृथ्वीराज पाटील यांनी मुंबई येथे खा शरद पवार यांची भेट घेतली.
गेली दहा वर्षे हर्षवर्धन पहिल्या फळीत कुस्ती करीत आहे. 2018 साली महाराष्ट्र केसरी किताब जिंकल्यावर डबल महाराष्ट्र केसरी किताबासाठी सातत्याने स्पर्धेत उतरला आहे यश अपयशाची तमा करत न करता त्याने कामगिरीत खंड पडू दिला नाही याबद्दल खासदार पवार यानी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.
पुढील काळात निधी अभावी सरावात खंड पडू नये आणि चांगला खुराक मिळावा यासाठीदरमहा ५० हजार रुपये प्रमाणे एकूण 12 लाख रुपयांची भरघोस मदत जाहीर केली आहे.केवळ मल्लाचे कौतुक करुन खा.पवार थांबले नाहीत तर अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात सराव करुन हर्षवर्धनने यश मिळवले, त्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या विकासासाठी आणि अद्ययावत सोईसुविधा निर्माण करण्यासाठी खा पवार यांनी 50 लाख रुपयांची विशेष आर्थिक मदत जाहीर करुन कुस्ती क्षेत्राला प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्याचे काम केले आहे.
मराठमोळ्या रांगड्या कुस्ती कलेला प्रोत्साहन आणि पाठबळ मिळाले पाहिजे यासाठी खा. शरद पवार यांनी सातत्याने पाठराखण केली आहे.महाराष्ट्रातील मल्ल आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले पाहिजेत याकरीता होतकरू मल्ल दत्तक घेऊन त्यांना सराव आणि खुराकसाठी यापूर्वी देखील त्यांनी निधी दिला आहे.खा.पवार हे चांगली कामगिरी करणाऱ्या मल्लांसाठी तारणहार आणि भक्कम आधार आहेत. कुस्ती क्षेत्रासाठी त्यांचे योगदान पैलवान कधीच विसरणार नाहीत.
ऑलिम्पिक खेळण्याचे माझे ध्येय आहे. माझ्या मनात आलेल्या निराशेमुळे मी कुस्तीतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता मात्र, गुरूवर्य काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनामुळे मी पुन्हा महाराष्ट्र केसरीच्या मैदानात उतरणार आहे. ऑलिम्पिक खेळण्याचे माझे ध्येय आहे. त्यासाठी शरद पवार यांनी दिलेली आर्थिक मदत प्रोत्साहन आणि उर्जा देणारी आहे, अशी प्रतिक्रिया डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांनी दिली.






