शेवगाव दुय्यम निबंधक कार्यालयात लाचखोरीचा बाजार; भ्रष्ट अधिकाऱ्यांवर वरिष्ठांचा वरदहस्त?
शेवगावचे दुय्यम निबंधक लंगोटे हे पदाचा गैरवापर करून सामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचा आरोप शेवगाव तालुका वडार समाजाचे अध्यक्ष अशोक धनवडे यांनी केला आहे. ४२ ब आणि ४२ ड नुसार शेतजमिनीच्या तुकड्यांची नोंदणी करण्यास बंदी असतानाही, केवळ आर्थिक लाभासाठी येथे सर्रास अवैध दस्त नोंदवले जात आहेत. फॉरेस्ट जमिनी आणि सरकारी निर्बंध असलेल्या जमिनींचे मूल्यांकन कमी दाखवून शासनाचा मोठा महसूल बुडवला जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या गंभीर आरोपांनंतर लंगोटे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कोणतीही ठोस प्रतिक्रिया न देता “आमच्या सरांची प्रतिक्रिया घ्या” असे सांगून हात झटकले. जेव्हा ‘नवराष्ट्र’ने या प्रकरणाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनद्वारे संपर्क साधला, तेव्हा त्यांनी “अहवाल मागवला आहे, तो आल्यावर कारवाई करू” असे मोघम उत्तर दिले. गेल्या अनेक दिवसांपासून वरिष्ठांकडून केवळ ‘अहवाल’चे कारण पुढे केले जात असल्याने, ही कारवाई टाळण्याचा किंवा वेळ मारून नेण्याचा प्रयत्न तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एकीकडे वरिष्ठ कारवाईचे आश्वासन देत असतानाच, विभागातील एका कर्मचाऱ्याने ‘नवराष्ट्र’शी बोलताना धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. “प्रत्येक तालुक्यातून दरमहा मोठा आर्थिक वाटा (हप्ता) वरिष्ठांना पुरवला जातो,” असे या कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. जर हे खरे असेल, तर खालच्या स्तरावर चालणाऱ्या भ्रष्टाचाराला वरिष्ठांचेच पाठबळ असल्याचे स्पष्ट होत आहे.
धनवडे यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे दाद मागितली आहे. येत्या दोन महिन्यांत संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. आता या प्रकरणावर राज्य सरकार काय भूमिका घेते आणि भ्रष्टाचाराची ही साखळी तोडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






