'मुंबई गोवा महामार्गाचे काम श्रीकांत शिंदेंकडे द्यावे...', शिंदे गटाकडून रविंद्र चव्हाणांना डिवचण्याचा प्रयत्न
बाबा खान, कल्याण: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. दरम्यान, गणपती उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला तरी महामार्गाची अवस्था दयनीय आहे. याचदरम्यान मागच्या वर्षी ज्यांनी जबाबदारी घेतली होती. त्यांनी जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही. आत्ता तात्पुरती दुरुस्तीची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. मी देवाला प्रार्थना करतो मुंबई गोवा महामार्गाचे काम खासदार श्रीकांत शिंदे अशा हुशार राजकारण्यात हे काम दिले तर तो रस्ता लवकर होईल असे विधान शिवसेना शिंदे गटाचे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याने केले आहे. मुंबई गोवा महामार्गावरुन पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाकडून सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना डिवचण्यात आले. यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मुंबई गोवा महामार्गावरुन राजकारण झाले आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना लक्ष केले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी कदम यांना सडेतोड उत्तर दिले. मात्र या दोन्ही नेत्यांच्या विधाननंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली. हा वाद कसाबसा शांत केला जात आहे. या वादामध्ये डोंबिवलीतील भाजप पदाधिकारी देखील उतरले होते. भाजप पदाधिकारी संदीप माळी आणि नंदू परब यांनी नाव न घेता खासदार शिंदे यांना लक्ष्य केले होते. दोन्ही पक्षाती नेत्यानी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शांत राहण्याच्या सुचना केली होती. विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर महायुतीला फटका बसेल असे बोलू नये अशी समज दिली होती.
मात्र पुन्हा एकदा शिवसेनेच्या युवा सेनेच्या पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी मुंबई गोवा महामार्गावरुन लक्ष करीत सडेतोड टिका केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीहून बसेस सोडण्यात आल्या. केडीएमसीचे माजी नगरसेवक विश्वनाथ राणे यांच्या उपस्थितीत बसेस साेडल्या गेल्या. यावेळी माध्यमाशी बेालतााना दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की, मागच्या वर्षी ज्यांनी जबाबदारी घेतली होती. त्यांनी जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही. आत्ता तात्पुरती दुरुस्तीची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. मी देवाला प्रार्थना करतो मुंबई गोवा महामार्गाचे काम श्रीकांत शिंदे अशा हुशार राजकारण्यात हे काम दिले तर तो रस्ता लवकर होईल . आत्ता भाजपकडून या वक्तव्यावर काय प्रतिउत्तर दिले जाते हे पाहणे महत्वाचे ठरेल.