Sanjay Raut PC: विधान परिषद आता सभागृह नाही तर 'डम्पिंग ग्राउंड' झालेय! संजय राऊतांचा थेट घणाघात
Sanjay Raut PC:“विधान परिषद निवडणुकाच नाही तर कोणत्याही निवडणुका आता सरळ आणि पारदर्शक मार्गाने होत नाहीत. मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून उमेदवार निवडून आणण्याची स्पर्धा सुरू असून कार्यकर्त्यांच्या प्रतिनिधित्वाची संकल्पना मागे पडली आहे. पूर्वी समाजकारण, विचार आणि जनाधार असलेले लोक विधान परिषदेत जात होते. आज परिस्थिती बदलली आहे. कोण किती पैसा खर्च करू शकतो यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे या निवडणुकांचा मूळ उद्देशच हरवला आहे,” अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घणाघात केला.
मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी विधान परिषद निवडणूक प्रक्रियेपासून ते भाजपच्या उमेदवार निवडीपर्यंत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी विधान परिषदेच्या इतिहासाची आठवण करून देत, एकेकाळी आचार्य अत्रे (Acharya Atre), शरद पवार (Sharad Pawar) यांसारखे दिग्गज नेते सभागृहात जात होते, असे सांगितले. “आज विधान परिषद हे सभागृह न राहता डम्पिंग ग्राउंड झाले आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाबाबत बोलताना ते म्हणाले की, पक्षाने अद्याप कोणत्याही उमेदवाराला अधिकृत उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलेला नव्हता. कोणी स्वतःच्या इच्छेने अर्ज घेतला असेल तर त्यात पक्षाची भूमिका नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच महायुतीतच संघर्ष होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“नैतिकतेचे धडे देणाऱ्यांनी उत्तर द्यावे”
भाजपकडून काही नेत्यांना दिल्या जाणाऱ्या उमेदवारीवरही राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले. “ज्या लोकांवर पूर्वी गंभीर आरोप केले गेले, त्यांनाच आज उमेदवारी दिली जात आहे. दिल्लीत बसून नैतिकतेचे धडे देणाऱ्यांनी याचे उत्तर द्यावे,” असा टोला त्यांनी लगावला.
शरद पवार यांची राष्ट्रवादी सोडून प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, अशा पक्षांतर करणाऱ्या नेत्यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेवर बोलताना त्यांनी सांगितले की, अनेक नेते आयुष्यभर एका विचारधारेसाठी काम करतात. मात्र आज सत्तेच्या राजकारणामुळे विचारधारा दुय्यम ठरत चालली आहे. “आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते आयुष्यभर एका विचाराशी बांधील राहिले, पण आता राजकारणात वेगळीच परिस्थिती दिसत आहे,” असे ते म्हणाले.
इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत बोलताना राऊत यांनी सांगितले की, ८ जून रोजी आघाडीतील प्रमुख नेते एकत्र येणार आहेत. बैठकीत आगामी राजकीय रणनीती आणि विविध मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉकरोच जनता पार्टी (CJP) ही एक सामाजिक चळवळ असल्याचे आहे. असं सांगत त्यांनी या चळवळीला शुभेच्छा दिल्या. मात्र, या व्यासपीठाचे राजकीय पक्षात रूपांतर होऊ नये, असे मतही त्यांनी व्यक्त केले. तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी अशा चळवळींना पाठिंबा द्यावा, असेही ते म्हणाले.
पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडींवर बोलताना राऊत यांनी भाजपवर विरोधी पक्ष फोडण्याचा आरोप केला. “महाराष्ट्रात शिवसेना फोडली, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि आता बंगालमध्येही तेच सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला. काही आमदारांना कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.






