बैठकीमध्ये पर्यटनस्थळांची निवड, आवश्यक पायाभूत सुविधा, पर्यटकांसाठी मूलभूत सोयी-सुविधा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, पर्यटन माहिती केंद्रे, डिजिटल प्रचार, स्थानिक कला, खाद्यसंस्कृती, पर्यटन सर्किटची निर्मिती, स्थानिक पर्यटनस्थळांचे ब्रँडिंग तसेच लोकसहभाग यावर विशेष भर देण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (भा.प्र.से) यांनी सांगितले की, “सिंधुदुर्ग जिल्हा नैसर्गिक सौंदर्य, समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, ग्रामीण पर्यटन आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यांचा संगम आहे. ‘वन स्टेट, वन डेस्टिनेशन’ उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्याची पर्यटन ओळख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करणे आवश्यक आहे.”
पर्यटन संचालनालयाचे संचालक श्री. मंगेश जोशी (भा.प्र.से) म्हणाले, “प्रत्येक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा पर्यावरणपूरक विचार करून योग्य पद्धतीने विकास करणे हे ‘वन स्टेट, वन डेस्टिनेशन’ या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला नैसर्गिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तसेच या माध्यमातून आवश्यक पायाभूत सुविधा, प्रभावी ब्रँडिंग आणि स्थानिक लोकसहभागाला प्राधान्य दिले जाईल. यामुळे स्थानिक रोजगार, उद्योजकता आणि आर्थिक विकासाला निश्चितच चालना मिळेल. प्राथमिक नियोजनानंतर संबंधित विभागांकडून सविस्तर प्रस्ताव प्राप्त करून व्यापक कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.”
बैठकीमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, आरती देसाई, पर्यटन संचालनालयाच्या कोकण विभागाचे उपसंचालक डॉ. प्रज्ञा मनोहर, पर्यटन संचालनालयाचे कार्यकारी अभियंता आकाश चकोर, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले तसेच विविध विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. पर्यटन क्षेत्राशी संबंधित विविध संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींनीही बैठकीत सहभाग घेत पर्यटन विकासासाठी नाविन्यपूर्ण सूचना मांडल्या.
सर्व कामे दर्जेदार अन् वेळेत पूर्ण करा, कामात हयगय करणाऱ्या ठेकेदारांवर…; नितेश राणे यांचे निर्देश






