दिल्ली लाठीचार्जचे महाराष्ट्रात पडसाद; माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा संतप्त एल्गार
कुर्डुवाडी / हर्षल बागल : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्ज आणि अश्रुधूराच्या माऱ्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले असून, त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने सोमवारी माढा येथे संतप्त आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांवरील कारवाईचा तीव्र निषेध नोंदवत प्रशासनामार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी, “लोकशाहीत प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तर देण्याऐवजी त्यांच्यावर लाठ्या चालवल्या जात असतील, तर तो केवळ विद्यार्थ्यांवरील हल्ला नसून लोकशाहीच्या मूल्यांवर झालेला प्रहार आहे,” अशी तीव्र भूमिका मांडली. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करून दडपशाहीचा मार्ग स्वीकारणे ही लोकशाहीला न शोभणारी बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. या संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात तालुकाध्यक्ष ॲड. बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सौदागर जाधव, माढा शहराध्यक्ष राजकुमार पालकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील घाटणेकर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष पल्लवी पाटील, विनोद गोटे, भारत खंडागळे, विशाल कामगे, विराज जाधव, वैभव गोरे, बाबासाहेब मोहोळ, दत्तात्रय सावंत, आदित्य हनवते, अक्षय शिंदे, नंदेश कदम, सत्यवान लटके, दयानंद जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर द्या; लाठ्या नव्हे !
याच घोषणांनी आंदोलन परिसर दणाणून गेला. विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी सरकार देशात शिक्षण व्यवस्था संपवत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा गैरवापर
दुसरीकडे, शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी संसदेचे पावसाळी अधिवेशन, जंतर मंतर येथील आंदोलन आणि अयोध्या राम मंदिरातील नैवेद्य चोरी प्रकरणावरून विरोधी पक्षांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, सार्वजनिक मुद्द्यांवर आवाज उठवणे हा लोकशाहीचा भाग आहे, परंतु आता काही पक्ष स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा गैरवापर करत आहेत.






