‘कुहू कुहू’ असं कधीतरी तुम्ही भल्या पहाटे किंवा संध्याकाळी झाडावर बसलेल्या कोकिळेच्या तोंडून नक्की ऐकले असतील. पण तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल, हे असे संगीताचे ध्वनी कोणा व्यक्तीचे नाव असेल तर! मेघालयाच्या घनदाट जंगलांमध्ये आणि निसर्गरम्य टेकड्यांमध्ये एक असे अद्भूत गाव वसलेले आहे, जिथे राहणाऱ्या माणसांना ओळखण्यासाठी आपल्यासारखी अक्षरांची नावे नसून गाण्याच्या सुबक मधुर धुनी वापरल्या जातात. होय, हे ऐकायला एखाद्या चित्रपटाच्या कल्पनेसारखे वाटत असले तरी ते पूर्णपणे सत्य आहे.
लग्नानंतर नवरदेव जातो सासरी! मुले आईचे आडनाव लावतात! मेघालयात इथे चालते मातृसत्ताक पद्धत!
संगीताच्या सुरांवर चालणारे गाव: मेघालयातील ‘काँगथॉन्ग‘, जिथे माणसांची नावे गाण्याच्या धुनी असतात!
भारताचे ईशान्येकडील राज्य असलेल्या मेघालयातील पूर्व खासी हिल्स जिल्ह्यात वसलेले ‘काँगथॉन्ग’ हे गाव जगभरात ‘व्हिसलिंग व्हिलेज’ म्हणजेच शिट्ट्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील खासी जमातीचे लोक आपल्या मुलांना हाक मारण्यासाठी कोणत्याही पारंपारिक नावाचा वापर करत नाहीत, तर प्रत्येकासाठी एक विशिष्ट आणि स्वतंत्र संगीताची धून तयार करतात. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावात गेल्यावर तुम्हाला माणसांच्या आवाजाऐवजी हवेत केवळ सुमधुर सुरांचे गुंजन ऐकायला मिळते, आहे कि नाही नवल!
‘जिंगरवाई इयावबेई‘ ही अनोखी परंपरा
या गावात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाला आईकडून एक विशिष्ट धून भेट म्हणून दिली जाते, ज्याला स्थानिक भाषेत ‘जिंगरवाई इयावबेई’ असे म्हणतात; ज्याचा अर्थ ‘वंशाच्या पहिल्या मातेचे गाणे’ असा होतो. मूल जन्माला आल्यानंतर त्याची आई त्याच्यासाठी मनातून एक सुंदर आणि नवीन धून तयार करते. या धुनीचे दोन प्रकार असतात—एक छोटी धून जी घरात मुलाला प्रेमाने हाक मारण्यासाठी वापरली जाते आणि एक मोठी धून जी जंगलात लांब अंतरावरून मुलाशी संवाद साधण्यासाठी वापरली जाते. आपल्या लहान मुलाला आई जेव्हा जेवायला आणि पाठीवर थोपवून झोपवायला घालण्यासाठी या धुनींचा वापर करतात. विशेष म्हणजे गावातील प्रत्येक व्यक्तीची धून पूर्णपणे वेगळी असते आणि कोणाचीही धून एकमेकांशी जुळत नाही.
निसर्गाशी जोडलेली संस्कृती आणि इतिहास
काँगथॉन्ग गावातील लोकांच्या मते, ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली असून हिचा थेट संबंध त्यांच्या भौगोलिक परिस्थितीशी आहे. येथील डोंगर आणि खोल दऱ्यांमुळे एकमेकांना आवाजाने हाक मारणे कठीण असते, परंतु संगीताचे सूर दऱ्याखोऱ्यांमधून प्रवास करत लांबपर्यंत सहज पोहोचतात. याशिवाय, शिकारीला किंवा जंगलात लाकूड गोळा करायला गेल्यावर जंगली प्राण्यांना मानवी आवाजाचा सुगावा लागू नये आणि दुष्ट शक्तींपासून मुलांचे रक्षण व्हावे, या विश्वासानेही ही सुरांची भाषा जन्माला आली. येथील लोकांकडे कागदोपत्री इंग्रजी किंवा खासी नावे असली, तरी गावात मात्र ते फक्त त्यांच्या संगीतमय धुनीनेच ओळखले जातात. ही खरोखरच खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, नाही का?






