सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात ऊस बिल, 'गोकुळ'विरोधातील १८ दिवसांचे आंदोलन स्थगित
‘गोकुळ थकीत ऊस बिल शेतकरी संघर्ष समिती’च्या वतीने सुरू असलेल्या या आंदोलनाने मागील काही दिवसांत तीव्र स्वरूप धारण केले होते. ४ जून रोजी शेकडो शेतकऱ्यांनी सोलापूर येथील साखर आयुक्त कार्यालयावर अर्धनग्न आंदोलन केले होते. त्यानंतर १० जून रोजी कंबर तलाव येथे दीड ते दोन हजार शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
आंदोलनाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी तसेच दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्या उपस्थितीत शेतकरी संघर्ष समितीच्या प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीस अरविंद घोडके, अमोल पाटील, बसवराज नरे, बाळासाहेब मोरे, नेताजी खंडागळे यांच्यासह अनेक शेतकरी नेते उपस्थित होते.
बैठकीत १६ जूनपर्यंत थकीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडण्यात आली. लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून संघर्ष समितीने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दिलेल्या मुदतीत पैसे जमा न झाल्यास १७ जून रोजी दुपारपासून पूनम गेट येथे अधिक तीव्र स्वरूपाचे ठिय्या आंदोलन पुन्हा सुरू करण्यात येईल, असा इशारा समितीने दिला आहे. आंदोलन स्थगित करताना आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार यांच्या हस्ते आंदोलक शेतकऱ्यांना ऊसाचा रस देण्यात आला.
शेतकऱ्यांच्या ऊस बिलाच्या आंदोलनाकडे माझे पहिल्या दिवसापासून लक्ष होते. मात्र, ठोस तोडगा निघत नसल्याने मी आंदोलनस्थळी आलो नव्हतो. प्रशासन आणि संबंधित यंत्रणांशी सातत्याने चर्चा करून शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यासाठी माझे शंभर टक्के प्रयत्न आहेत. शेतकऱ्यांसोबत कायम उभा असून पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही. -आमदार सचिन कल्याणशेट्टी
सोलापूर महापालिकेच्या डिजिटल क्रांतीला वेग, आयटी तज्ज्ञांशी विनामूल्य करार, तब्बल 6 कोटींची बचत






