फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Kargil Vijay Diwas History: दरवर्षी २६ जुलै हा दिवस संपूर्ण भारतात अत्यंत अभिमानाने, उत्साहाने आणि आदराने ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. १९९९ मध्ये लडाखमधील कारगिलच्या उंच आणि अत्यंत प्रतिकूल बर्फाच्छादित शिखरांवर लढल्या गेलेल्या युद्धात भारतीय लष्कराने मिळवलेल्या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजयाचे हे प्रतीक आहे. पाक सैन्याने आणि घुसखोरांनी नियंत्रण रेषा ओलांडून चोरट्या मार्गाने कब्जा केलेल्या मोक्याच्या जागा भारतीय जवानांनी प्राणाची बाजी लावून पुन्हा ताब्यात घेतल्या आणि शत्रूचा दारुण पराभव केला. हा दिवस केवळ एका लष्करी विजयाचा उत्सव नाही, तर देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना नमन करण्याचा एक पवित्र सोहळा आहे.






