गणेशोत्सवानिमित्त मेट्रो सेवा रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार (फोटो सौजन्य-X )
महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमएमओसीएल) गणेशोत्सवादरम्यान मेट्रो ट्रेन सेवेच्या वाढीव फेऱ्या चालविण्याचा मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे. एमएमआरडीएचे महानगर आयुक्तआणि महा मुंबई मेट्रोचे अध्यक्ष डॉ. संजय मुखर्जी, भाप्रसे, यांनी ही घोषणा केली. उत्सवाच्या काळातील वाढीव फेऱ्यांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी परिवहन सेवा वाढविण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.
गणेशोत्सवादरम्यान रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली. हे लक्षात घेता ११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर, २०२४ या कालावधीत अंधेरी (पश्चिम) आणि गुंदवली या दोन्ही टर्मिनल्सवरून शेवटची मेट्रो ट्रेन रात्री ११ ऐवजी रात्री ११.३० वाजता सुटेल. गणेशोत्सवात रात्री उशीरापर्यंत सहभागी झालेल्या भाविकांना आपापल्या घरी पोहचता यावे, हा या विस्तारीत सेवेचा उद्देश आहे.
या निर्णयाबद्दल महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि मुं.म.प्र.वि.प्राधिकरणाचे महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी म्हणाले, गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सांस्कृतिक उत्सव आहे. या उत्सव कालावधीत सर्व भक्त आणि नागरिकांसाठी अखंडित वाहतूक सुविधा पुरवणे ही आमची जबाबदारी आहे. मेट्रो सेवेच्या फेऱ्यांमध्ये वाढ केल्याने उत्सवाच्या कालावधीत प्रवाशांना रात्री उशीरा प्रवास करण्यासाठी कार्यक्षम व सुविधाजनक पर्याय उपलब्ध होईल, याची खातरजमा आम्ही केली आहे.
महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल म्हणाल्या, आम्ही नेहमीच आमच्या प्रवाशांच्या गरजांना प्राधान्य दिले आहे. गणेसोत्सवादरम्यान ट्रेनच्या वेळा वाढवण्याचा निर्णय म्हणजे प्रवाशांना अधिक सुविधाजनक अनुभव देण्यासाठी असलेल्या आमच्या वचनबद्धतेचे द्योतक आहे. या वाढीव फेऱ्यांमुळे गर्दी विभागली जाण्यास मदत होईल, त्याचप्रमाणे उत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन घरी परतण्यासाठी सुरक्षित व विश्वासार्ह प्रवासाची खातरजमा होईल.
अंधेरी (पश्चिम) आणि गुंदवली टर्मिनल्सवरून शेवटच्या ट्रेनची वेळ ३० मिनिटांनी वाढवण्यात येणार आहे.
दोन्ही टर्मिनल्सवरून अतिरिक्त मेट्रो ट्रेन रात्री ११.१५ आणि ११.३० वाजता सुटतील.
गुंदवली ते दहिसर (पूर्व)आणि अंधेरी (पश्चिम) ते दहिसर (पूर्व) या स्थानकांदरम्यान चार वाढीव फेऱ्या सुरु केल्या जातील.
१. गुंदवली ते अंधेरी (पश्चिम): रात्री १०:२०, १०:३९, १०:५० आणि ११ वाजता (४ सेवा)
२. अंधेरी (पश्चिम) ते गुंदवली : रात्री १०:२०, १०:४०, १०:५० आणि ११ वाजता ( ४सेवा)
३. गुंदवली ते दहिसर (पूर्व): रात्री ११:१५ आणि ११:३० वाजता (२सेवा)
४. अंधेरी पश्चिम ते दहिसर (पूर्व): रात्री ११:१५ आणि ११:३० वाजता (२सेवा)
५. दहिसर (पूर्व) ते अंधेरी पश्चिम : रात्री १०:५३, ११:१२, ११:२२ आणि ११:३३ वाजता (४सेवा)
६. दहिसर (पूर्व) ते गुंदवली : रात्री १०:५७, ११:१७, ११:२७ आणि ११:३६ वाजता (४सेवा)
महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आपल्या प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा देण्यास नेहमीच कटिबद्ध आहे. वाढीव वेळेमुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार आहे.