ठाणे/स्नेहा जाधव : राज्यात सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. गुरुवारीच दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला आहे. याचपार्श्वभूमीवर डायघर गावातील डम्पिंग ग्राउंडवर आज पहाटे धक्कादायक प्रकार समोर आला. मुंबईतील दीड दिवसाच्या गणपती विसर्जन झालेल्या शंभर ते दीडशे ट्रकमधील मूर्ती येथे विल्हेवाटीसाठी आणल्या गेल्या. हा सगळा प्रकार लक्षात येताच स्थानिकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
ज्या देवातची मनोभावे पूजा करता त्यालाच नंतर कचऱ्याच्या कुंडीत टाकता. देवाची ही अशी विटंबना करताना काहीच कसं वाटत नाही अशा परखड शब्दांत गावकऱ्य़ांनी टीका केली आहे. या संतापजनक घटनेची दखल घेत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे.
घडलेल्या धक्कादायक प्रकरणावर जिल्हाप्रमुख दिपेश पुंडलिक म्हात्रे म्हणाले की,“स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे सरकारच जर आपल्या आराध्य दैवत गणरायाचा अपमान करत असेल तर तो महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल व्हायला हवेत. गणरायाचा अपमान करणाऱ्यांना जागेवर आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.”
कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनीही संताप व्यक्त करून म्हटलं की,“गणपती बाप्पा हे महाराष्ट्राच्या घराघरात पूजले जाणारे आराध्य दैवत आहेत. विसर्जनानंतर मूर्तींचा अवमान हा धार्मिक भावनांचा अपमान आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. या असंवेदनशील शासनाचा विसर्जनाचा दिवस लांब नाही.”
डायघरच्या डम्पिंग ग्राऊंडजवळ दीड दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी शुक्रवारी टेम्पोतून आणल्या होत्या. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाल्यानंतर त्यांनी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. तसेच गणेशमूर्तीची विटंबना होत असल्याने त्या डम्पिंग ग्राऊंडजवळ टाकण्यास स्थानिकांनी कडाडून विरोध केला.
देवाच्या होणाऱ्य़ा विटंबेबाबत स्थानिकांनी अधिकाऱ्य़ांना जाब विचारला आहे. यावर प्रतिक्रिया देत अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की, पर्यावरणासाठी असलेल्या नियमांनुसार समुद्रामध्ये सहा फूटांपेक्षा लहान आकाराच्या मूर्ती समुद्रात विसर्जित करता येत नाही. याचकारणामुळे त्यामुळे विसर्जनानंतर गणेशमूर्ती येथे आणून ठेवल्या जाणार असल्याचे अधिकाऱ्य़ांनी स्पष्ट केले. मात्र अधिकाऱ्यांच्या या निर्णयाला न जुमानता गावकऱ्यांनी हा ट्रक पुन्हा परतवून लावला आहे. य़ा सगळ्या प्रकरणामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.