सौजन्य - नवराष्ट्र टीम
दौंड : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल कधीही वाजू शकतो असे चित्र सध्या सर्वच मतदारसंघात दिसते आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना ( शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) महायुतीच्या माध्यमातून सामोरे जाणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. वरिष्ठ पातळीवर जागा वाटपाची चर्चाही सुरू आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जागा मिळविण्यासाठी महायुतीतील तीनही पक्ष प्रयत्नशील दिसत आहेत. त्या अनुषंगानेच दौंड विधानसभा मतदारसंघाची जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला मिळावी, अशी मागणी अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांनी केली आहे.
जगदाळे यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना दिले आहे. जगदाळे यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. यावेळी बोलताना जगदाळे म्हणाले की , आमच्या मागणी प्रमाणे जर दौंड विधानसभेची जागा पक्षाला मिळाली तर मी स्वतः ही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.
दौंड तालुक्याच्या दृष्टिकोनातून दौंड विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अतिशय फायद्याची ठरणार आहे. तालुक्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे, सद्यस्थितीत पक्षाचे सर्व पदाधिकारी, पक्षाच्या माध्यमातून विविध संस्थांवर काम करत असणारे कार्यकर्ते हे एकसंघ राहून चांगले काम करीत आहेत. मागील जिल्हा परिषद, पंचायत समिती व दौंड नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. दौंड शहर व तालुक्यात पक्षाच्या विचारधारेवर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते, मतदार आहेत, 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराचा अतिशय अल्प मतांनी पराभव झाला ही गोष्ट याची साक्ष देते.
आपण राज्यभर करत असलेले काम त्याचप्रमाणे आपण जाहीर केलेल्या शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्ते दौंड तालुक्यात करीत आहेत. या सर्व गोष्टींचा फायदा निश्चितच येणाऱ्या विधानसभेत आपल्या पक्षाला होईल अशी खात्री आम्हाला वाटते. त्यामुळे दौंड विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे घ्यावी ही विनंती आम्ही सर्व कार्यकर्ते करत आहोत त्याचप्रमाणे आपण जो उमेदवार द्याल त्या उमेदवारास भरघोस मतांनी निवडून आणण्याची ग्वाही देत आहोत असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला मिळावी, अशी मागणी आम्ही केली होती. मागणीप्रमाणे आम्हाला ती मिळाली, या निवडणुकीत महायुतीमधील मित्रपक्ष भाजपा व शिवसेनेने आमचे काम इमाने इतबारे केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी दौंडची जागा आम्हाला मिळावी, म्हणून आम्ही मागणी केली आहे. मात्र जर आम्हाला जागा मिळाली नाही व मित्रपक्षाला गेली तरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा धर्म पाळून त्यांनी जसे आमच्या पक्षाचे काम केले तसे आम्ही सुद्धा मित्र पक्षाच्या उमेदवाराचे काम नक्की करू ,असेही वीरधवल जगदाळे यांनी बोलताना सांगितले.