मुंबई : रविवारी म्हणजे काल महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान सोहळा कार्यक्रम पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण सन्मान देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis) हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. पण भर दुपारी पार पडलेल्या याच कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या काही जणांना तीव्र उष्णतेचा मोठा त्रास जाणवू लागला. त्यानंतर अनेक श्रीसेवकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यामध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. आणखी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जातंय. तसेच यातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना, राज्य सरकारवर टिका केली. “कार्यक्रमातील नियोजन ढिसाळ होते, ऐन दुपारी भर उन्हात कार्यक्रम का घेतला, याची चौकशी झाली पाहिजे. यात अकरा जणांचा बळी गेला आहे, अजून काही गंभीर जंखमी आहेत, त्यामुळं शिंदे-फडणवीस सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे”, अशी मागणी केली.
अजित पवार रोखठोक आहेत पण…
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. अजित पवारांच्या नाराजीबाबत माध्यमांनी प्रश्न विचारताच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, अजित पवार काल आमच्यासोबत होते, आम्ही एकत्र विमानातून प्रवास केला. ते रोखठोक आहेत, असलेही पाहिजे कारण ते विरोधीपक्षनेते आहेत, पण अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून भाजापात जातील, असं मला वाटत नसल्याचा पुर्नउच्चार संजय राऊतांनी केला.
एनसीपी फोडण्यासाठी टाकला जातोय
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, काही आमदारांबाबत काही प्रकरणं चालू आहेत. त्यांच्यावर धाडी घालण्यासारखे प्रकार होत आहेत. त्यांना सांगितलं जातंय की तुम्ही राष्ट्रवादी सोडा आणि भाजपाला पाठिंबा द्या. शिवसेना ज्या प्रकारे ईडी, सीबीआय, पोलीस यंत्रणा, तपास यंत्रणांचा दबाव टाकून फोडली आणि हे सरकार बनवण्यात आलं, त्याच प्रकारचा दबाव एनसीपी फोडण्यासाठी टाकला जात आहे. असा राऊतांनी भाजपावर आरोप केला.
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे
काल रात्री उष्माघाताने बळी गेल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनं शिंदे-फडणवीस सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली आहे. यानंतर आता ठाकरे गटाते खासदार संजय राऊत यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली आहे. समोर सहा-सात तास उन्हात बसलेल्यांची सोय न पाहाता व्यासपीठावर जो राजकीय मंच सजला होता. नियोजनचा अभाव दिसला. कार्यक्रम दुपारी का घेतला याची चौकशी झाली पाहिजे, असं राऊत म्हणाले.