लोणावळा : मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावातील घटना ही निंदनीय व चिड आणणारी आहे. महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी देशातील खासदारांनी संसदेत कडक कायदा करावा, अशी अपेक्षा छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली. तसेच सदर आरोपीला कडक शासन व्हावे, अशी मागणी केली आहे.
शिवक्रांती कामगार संघटनेचा कामगार मेळावा आज लोणावळ्यात पार पडला. या मेळाव्याला माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस अँड. विजयराव पाळेकर, मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्याचे समन्वयक विनोद साबळे, संघटनेचे खजिनदार रविंद्र साठे, चिटणीस गुलाबराव मराठे, चिटणीस ब्रिंदा गणात्रा, संघटक रमेश पाळेकर, प्रतिक पाळेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले, समाजातील कष्टकरी, कामगार, शेतकरी अशा विस्थापितांना सोबत घेऊन स्वराज्याचे सुराज्य करायचे आहे. तुळजापूर येथे स्वराज्य संघटनेची स्थापना होणार असून त्याची पायाभरणी लोणावळा शहरातून झाली असल्याचे उद्गार संभाजीराजे यांनी काढले. पुढे छत्रपती संभाजीराजे म्हणाले, मी छत्रपती घराण्याचा वारसदार असलो तरी जनतेच्या व समाजाच्या कल्याणासाठी विविध राजकीय पक्षांकडे गेलो, मात्र ज्याप्रमाणे साडेतीनशे वर्षापुर्वी प्रस्थापितांनी छत्रपती शिवाजी राजे यांची अवहेलना केली. तोच अनुभव मलाही अनुभवायला मिळाली. राजेंनी त्याकाळी विस्थापितांसाठी स्वराज्याची निर्मिती केली. त्याच पद्घतीने समाजातील विस्थापितांना सोबत घेऊन स्वराज्याचे सुराज्य करण्याचे स्वप्न मी बाळगले आहे.
शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस अँड विजयराव पाळेकर यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेला शिवक्रांतीचा प्रत्येक कामगार साथ देईल तसेच माजी दोन्ही पुत्र मी स्वराज्य उभारणीसाठी महाराजांकडे सुपुर्द करतो, असे अभिवचन दिले. पाळेकर म्हणाले आज देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना कामगारांना घटनेने दिलेल्या त्यांच्या मुलभूत अधिकारांसाठी झगडावे लागत आहे ही एक शोकांतिका आहे. समाजातील असंघटित कामगारांना संघटित करत शिवक्रांती कामगार संघटना मागील २५ वर्षापासून कामगार क्षेत्रात काम करत आहे. येथे घराणीशाहीला थारा नाही, कामगार हितासाठी काम करणार्या संघटकांचे जाळे येथे विणले आहे. त्यामधून कोणी एक जण या संघटनेचा वारसदार असेल. गोरगरीब व कष्टकरी समाजांचे राजकारण्यांना काही देणेघेणे राहिलेले नाही, केवळ मतांसाठी त्यांचा वापर केला जातो. आज समाजातील कष्टकरी, शेतकरी, कामगार हे सर्वजण छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे आशेने पहात आहे. याकरिता त्याच्या स्वराज्य निर्मितीत शिवक्रांतीचा प्रत्येक घटक त्यांना साथ देईल.
[read_also content=”सरपंचांना गाव विकासाची मोठी संधी, त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा : दत्तात्रय भरणे https://www.navarashtra.com/maharashtra/big-opportunity-for-village-development-for-sarpanchs-take-full-advantage-of-it-dattatraya-bharne-nrdm-313174.html”]
या मेळाव्याचे सूत्रसंचालन विजय बोत्रे यांनी केले तर प्रस्ताविक अँड प्रथमेश पाळेकर यांनी सादर केले. रविंद्र साठे यांनी आभार मानले. मेळाव्याची सुरुवात कोल्हापूर दरबारातील शाहिर डाॅ. आझाद नाईकवडे यांच्या शाहिरीने झाली. यानंतर चौघाडा वादक रमेश पांचागे यांनी उत्कृष्ट चौघडा वादन सादर केले. सातार्याहून आलेल्या तुतारी वादकांचा देखील राजे यांनी सन्मान केला. शिवक्रांती कामागार संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीराजे यांनी आयोध्येतील श्रीराम मंदिराची व भगवान श्रीराम यांची प्रतिकृती भेट दिली.