पुणे : गेल्या चार महिन्यात भाजपचे (BJP Leaders) तीन नेत्यांचे दुर्धर आजाराने निधन झाल्याने पक्षाचे राजकीयदृष्ट्या मोठे नुकसान झाले आहे. ही नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी पक्षाला अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत.
डिसेंबर महिन्यात कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले. काही दिवसांतच चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. आता खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले. भाजपचे दोन विद्यमान आमदार आणि एक विद्यमान खासदार यांच्या निधनाने पक्षात नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. विशेषत: खासदार बापट यांच्या निधनामुळे शहर पातळीवर आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाची उणीव भाजपला पुढील काळात असेल.
खासदार बापट यांच्यानंतर शहराच्या राजकारणावर प्रभाव आणि पकड निर्माण करणारे नेतृत्व हे शहर भाजपमध्ये दिसत नाही. किंबहुना हीच परीस्थिती इतर पक्षांतही दिसत आहे. काँग्रेसचे तत्कालीन खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचा शहराच्या राजकारणावर चांगला पगडा होता. त्यांच्यानंतर खासदार बापट यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.
मुक्ता टिळक यांचं 22 डिसेंबरला निधन
मुक्ता टिळक यांची ५७ व्या वर्षी प्राणज्योत प्रदीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली होती. मुक्ता टिळक कॅन्सरशी लढा देत होत्या. परंतु, २२ डिसेंबर २०२२ रोजी त्यांची झुंज अखेर अयशस्वी ठरली. मुक्ता टिळक या लोकमान्य टिळक यांची पणतू सून होत्या. पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या त्या विद्यमान आमदार होत्या. त्या ४ वेळा नगरसेवक राहिल्या होत्या. मुक्ता टिळक यांनी सन २०१७ ते २०१९ या काळात पुण्याचे महापौरपद भूषवले होते. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांना मतदानासाठी मुंबईत एअर अॅम्ब्युलन्सनं नेण्यात आलं होतं. त्यांच्या प्रतिमेचा उपयोग पक्षाला नेहमीच होत असे.
लक्ष्मण जगताप यांचं 59 व्या वर्षी निधन
लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी रोजी ५९ व्या वर्षी निधन झाले होते. १९९३-९४मध्ये ते महापालिका स्थायी समिती सभापती होते. २००३-०४ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था गटातून त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली. विधान परिषदेची निवडणूक अपक्ष लढवून विजय मिळवला. २०१४ ची विधानसभा निवडणूक भाजपतर्फे लढवून विजय मिळवला.
जून महिन्यात झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी लक्ष्मण जगताप यांचे एक मत भाजपासाठी बहुमोल ठरले होते. आजारी असतानाही मुंबईला रुग्णवाहिकेतून येऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या राजकारणात जगताप यांची भूमिका ही नेहमीच महत्वाची ठरली होती. या तीन नेत्यांची पोकळी भरून काढण्याचे आव्हान आता भाजपसमोर आहे.