'या' नंबरवर कॉल करून मिळवा मदत, टोल फ्री हेल्पलाईन जारी
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी ‘एल्डरलाईन – १४५६७’ ही राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाइन सुरू केली आहे. राज्यात राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान (एनआयएसडी), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येते.
या हेल्पलाइन चे काम २६ जानेवारी, १५ ऑगस्ट व २ ऑक्टोबर वगळता वर्षातील ३६२ दिवस आणि आठवड्याचे सर्व दिवस सकाळी ८ ते संध्याकाळी ८ पर्यंत चालते. याद्वारे आरोग्यविषयक जागरूकता, वृद्धाश्रम, डे केअर सेंटर, पोषण, सांस्कृतिक, कला, ज्येष्ठांसंबंधी अनुकूल उत्पादने, आणि मनोरंजनाशी संबंधित माहिती पुरविण्यात येते.
वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर कायदेविषयक, मालमत्ता, शेजारी आदींच्या अनुषंगाने वाद निराकरण, आर्थिक, निवृत्तीवेतन संबंधित सल्ला आणि सरकारी योजनांच्या माहितीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात येते. चिंता निराकरण, नातेसंबंध व्यवस्थापन, मृत्यूशी संबंधित भीती निवारण, वेळ, ताण, राग आदीच्या अनुषंगाने जीवन व्यवस्थापन, मृत्युपत्र बनवण्याचे महत्त्व आदी मृत्यूपूर्वीचे दस्तऐवजीकरण आदी अनुषंगाने ही मदत करण्यात येते. यासंदर्भात राज्यभरातून जेष्ठ नागरिकांसाठी चार लाखाहून अधिक मदतीचे दूरध्वनी आले आहेत. त्यामध्ये जेष्ठ नागरिकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या मदत हेल्पलाइनने केली आहे. तसेच तीस हजाराहून अधिक प्रकरणे क्षेत्रीय पातळीवर यशस्वीरित्या हाताळली आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना राबविण्यात येतात –
वृद्धाश्रम योजना – ही सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिकांसाठी असणारी योजना आहे.
मातोश्री वृद्धाश्रम योजना – ६० वर्षांवरील नागरिकांना ओळखपत्र देणे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे बस भाडे सवलत (६५ वर्षांवरील नागरिकांसाठी,५०% भाडे सवलत)
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मोफत बस प्रवास ( ७५ वर्षांवरील नागरिकांसाठी )
संजय गांधी निराधार अनुदान योजना
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाल निवृतीवेतन योजना
ज्येष्ठ नागरिकांसाठी “ज्येष्ठ नागरिक कायदा” मंजूर करण्यात आलेला आहे.
ज्यांचे (स्त्री किंवा पुरुष) वय साठ (६०) वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे ते “ज्येष्ठ नागरिक” समजण्यात येतात.
ज्येष्ठ नागरिकांचा पाल्य म्हणजे या कायद्यानुसार रक्तसंबंधातील मुले/मुली नातू व नात यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक “ज्येष्ठ नागरिक न्यायाधीकरण” स्थापन केले आहे.
ज्येष्ठ नागरिक यांना त्यांचे परिपोषणाबद्दल अथवा निर्वाहभत्याबाबत काही तक्रार असल्यास, ती प्रत्येक संबंधीत जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण किंवा संबंधीत जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी (महसूल) तसेच ज्येष्ठ नागरिक न्यायाधीकरण यांचेकडे अर्जाद्वारे ती तक्रार दाखल करता येते.
प्रत्येक जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग हे पदसिद्ध “निर्वाह अधिकारी” असतात
ज्येष्ठ नागरिकांचे परिपोषण किंवा निर्वाहभत्ता याबद्दल तक्रारी ह्या पीठासीन अधिकारी यांचेकडेही सादर करता येतात. प्रत्येक जिल्ह्यासाठी त्या संबंधीत जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी (महसूल) हे पीठासीन अधिकारी असतात.