मुंबई : दिवंगत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai) यांना ‘मातोश्री’च्या निकटवर्तीयांनी धमकी दिली होती. ठाकरे नामक सिनेमाचे शूटिंग देसाईंच्या एनडी स्टुडिओत (ND Studio) झाले होते. त्याचे त्यांना पैसे देण्यात आले का? असा सवाल उपस्थित करतानाच उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांना एनडी स्टुडिओ हवा होता, असा गंभीर आरोप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला.
नितीन देसाई यांनी नुकतीच आत्महत्या केली. कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे. पण भाजप आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणी उद्धव ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप करून एकच खळबळ उडवून दिली आहे.
देसाई एक चांगले व्यक्ती होते. त्यांचा एनडी स्टुडिओ उद्धव व रश्मी ठाकरेंना हवा होता. यासाठी देसाई यांच्यावर दबाव टाकला जात होता. या प्रकरणी ‘मातोश्री’च्या जवळचा एक माणूस देसाईंना वारंवार धमक्या देत होता, असेही नितेश राणे यांनी म्हटले.