भर पावसात आरपीआय कार्यकर्त्यांची निषेध फेरी काढुन जोरदार घोषणाबाजी केली
उंब्रज / प्रतिनिधी : दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कराड उत्तर तालुका आघाडीने दिलेल्या बंदच्या हाकेला गुरुवारी (दि. २३) उंब्रजमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. दुपारपर्यंत शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून बहुतांश व्यापारी प्रतिष्ठानांनी स्वयंस्फूर्तीने शटर बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. दुपारनंतर मात्र काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने पुर्वरत सुरू केली.
नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी २० जुलै रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला असून, अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा दावा आंदोलकांकडून करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ देशभर विविध ठिकाणी आंदोलने होत असून त्याचे पडसाद उंब्रजमध्येही उमटले.
Wardha : भरपावसात गांधीगिरी ! पेपरफुटीवर काँग्रेसची आक्रमक भूमिका…
या बंदबाबत आरपीआय (आठवले)च्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी उंब्रज पोलीस ठाण्यात निवेदन देवून आंदोलनाची माहिती दिली होती. तसेच व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने सकाळपासूनच उंब्रजमधील बहुतांश दुकाने बंद राहिली.
दरम्यान, मुसळधार पाऊस सुरू असतानाही आरपीआय कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हातात घेऊन उंब्रज शहरातून निषेध फेरी काढली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अन्यायाचा निषेध नोंदविण्यात आला. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. भर पावसातही कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राहिल्याने ही निषेध फेरी नागरिकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.






