कल्याण : २७ एकर शासकीय जागेवर अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. तहसीलदारांना वारंवार माहिती देऊन देखील एकही कारवाई होत नाही. तहसीलदारांना कोणाचा तरी दबाव असल्याने ही कारवाई होत नसल्याची मला खंत आहे. हे सर्व प्रकार थांबले तर कल्याण पूर्वेचा विकास होणार असे धक्कादायक विधान भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केले आहे. त्यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड हे कल्याण पूर्वेत विकासाबद्दल सातत्याने विधान करीत आहेत. गायकवाड यांनी कल्याण पूर्वेचा विकास का झाला नाही. कशा प्रकारे त्यांची कामे रोखली गेली आहेत. हे जाहिर कार्यक्रमात बोलून दाखविले आहे. आत्ता ताजी घटना कल्याण पूर्वेतील गणेश टेकडी परिसरात घडली आहे. या ठिकाणी एका मंदिराच्या कामासाठी आलेल्या निधीतून मंदिराचे काम होणार आहे. त्या कामाचे भूमीपूजन आमदारांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात पुन्हा एकदा गायकवाड यांनी सांगितले की, सर्व नेत्यांनी विकास कामाना पाठिंबा दिला पाहिजे. त्यामुळे अनेक कामे थांबविली गेली आहेत. त्यासाठी मी निधी मंजूर करुन आणला आहे. केडीएमसीत सत्ता असताना आरक्षित भूखंड वाचविण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून काही प्रयत्न केले नाही. मी निवडून आल्यापासून अनेक आरक्षित भूखंड वाचविले आहेत.
याचवेळी त्यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरातील २७ एकर गुरचरण जागा आहे. ती समाजाच्या कामासाठी आली असती. मात्र जागेवर अनधिकृत बांधकाम सुरु आहे. या प्रकरणी तहसीलदारांकडे तक्रार दिली आहे. वारंवार तक्रार करुन तहसीलदारांकडून काही एक कारवाई केली जात नाही. त्यांच्या कोणाचा दबाव आहे. ती अनधिकृत बांधकामे थांबत नाही याची खंत वाटते. या गोष्टीत कुठल्या तरी लोकाचे वर्चस्व असणे आणि त्यांच्यावर दबाव तंत्र असणे चुकीचे आहे. ती अनधिकृत बांधकामे थांबली पाहिजे. तर कल्याण पूर्वेचा विकास होऊ शकतो.
दरम्यान आमदार गायकवाड यांनी केलेल्या आरोपासंदर्भात कल्याणचे तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही या जागेचे सर्वेक्षण केले आहे. आठ दिवसात कारवाई होणार आहे.